रात्रीच्या अंधारात अग्निशामक दलाचे जवान विझविताहेत भिवंडीतील गोदामाची आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 10:54 PM2018-02-03T22:54:18+5:302018-02-03T23:05:25+5:30
भिवंडी : तालुक्यातील दापोडा ग्रामपंचायत हद्दीतील इंडियन कार्पोरेशन गोदाम संकुलात शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास १२ गोदामांना लागलेली आग विझविण्यासाठी रात्रीच्या अंधारात अग्निशामकदलाचे प्रयत्न सुरू असुन ही आग शांत करण्यासाठी अजून सकाळ उजाडेल,अशी माहिती अग्निशामकदल प्रमुख डी.एन साळवी यांनी दिली.
दापोडा येथील इंडियन कॉर्पोरेशनमध्ये अॅपेक्स मिनरल वॉटर प्युरीफायर कंपनीच्या गोदामास शनिवारी दुपारी २-३० वाजताच्या सुमारास आग लागली. त्या ठिकाणी प्लास्टीकच्या बाटल्या बनविण्यासाठी कच्चा माल म्हणून साठविलेल्या प्लॅस्टिकच्या दाण्यांच्या साठ्याला सुरूवातीला आग लागली. आग विझविण्याचे साहित्य कंपनीत नसल्याने भडकलेली आग नजीकच्या व्होल्टास कंपनीच्या गोदामांस लागली. त्या गोदामांत साठविलेले फ्रीज,एसी, पंखा तसेच इतर इलेक्ट्रीक सामान आगीत जळून खाक झाले.आगीची भिषणता अचानक वाढल्याने परिसरांतील आकाशात सुमारे ५० ते १०० मीटरपर्यंत धुराचे लोट पसरले होते. आगीत व्होल्टास कंपनीचे ७ तर मिनरल वाटर कंपनीचे ३ व इतर केमीकलचे २ गोदाम आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत.या दुर्घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशामक दलास मिळताच जवानांनी घटनास्थळी धाव घेवून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने कल्याण,उल्हासनगर व ठाणे येथील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले आहे. रासायनिक द्रव्य मिश्रित पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न जवानांनी केला. घटनास्थळावरचा अग्नितांडव पाहता परिसरांतील गोदाम व्यवस्थापकांनी कामगारांना सुट्टी देऊन आपापली गोदामे बंद केली.त्यामुळे तेथील कामगारांनी मिळेल त्या वाटेने पळ काढला.तर काही कामगारांनी आग पहाण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे आग विझविण्यासाठी अडथळे होऊ लागले.तसेच कोणताही अपघात होऊ नये म्हणून गर्दीला हटविण्यासाठी पोलीसांनी प्रयत्न केले. खबरदारीचा उपाय म्हणून नारपोली पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी रूग्णवाहिका व पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात केला. प्रथमदर्शनी कोणतीही प्राणहानी झाली नसल्याचे सांगण्यात येते.मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. आग विझविण्यासाठी पाण्याचा तुटवडा जाणवत असताना परिसरांतून पाणी उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असुन आग आटोक्यात आली आहे.परंतू परिसरांत धुमसणारी आग शांत होण्यासाठी रात्रभर प्रयत्न करावे लागणार असुन सकाळ उजाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान कोणताही धोका होऊ नये म्हणून केवळ घटनास्थळाच्या गोदाम भागातील ट्रान्सफार्मर बंद केला असुन घटनास्थळी अंधारात आग विझविण्याचे काम अग्निशामकदलाच्या जवानांनी सुरू ठेवले आहे. ही आग पुर्णत: शांत होण्यासाठी रविवारची सकाळ उजाडणार असल्याची माहिती दिली जात आहे.