भाजपाच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे पालिका मुख्यालयात आग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 08:55 PM2018-10-29T20:55:59+5:302018-10-29T20:56:21+5:30
भाजपाचे अॅड. रवी व्यास यांनी सोमवारी स्थायी समिती सभापतीचा पदभार स्वीकारतेवेळी त्यांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी पालिका मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावर पेपर बॉम्ब फोडल्याने आग लागल्याची घटना सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली.
भार्इंदर - भाजपाचे अॅड. रवि व्यास यांनी सोमवारी स्थायी समिती सभापतीचा पदभार स्विकारतेवेळी त्यांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी पालिका मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावर पेपर बॉम्ब फोडल्याने आग लागल्याची घटना सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली.
व्यास हे गणेश देवल नगर मधून भाजपाच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर त्यांची यंदा स्थायी समिती सभापती पदी निवड झाली आहे. यामुळे त्यांच्या प्रभागातील कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाल्याने सोमवारी त्यांच्या पदग्रहण सोहळ्यावेळी कार्यकर्त्यांनी चक्क पालिका मुख्यालयातील दुसय््राा मजल्यावर लिफ्टच्या जवळ पेपर बॉम्ब फोडण्यास सुरुवात केली. एकामागोमाग एक असे अनेक पेपर बॉम्ब फुटल्याने त्यातील कागदांनी चांगलाच पेट घेतला. या पेपर बॉम्बच्या आवाजाने लिफ्टमधील लोकांना बाहेर येण्यास तर दुसऱ्या मजल्यावरील लोकांना लिफ्टमध्ये जाण्यात अडचण निर्माण झाली होती. त्यातच पेपर बॉम्बने पेट घेतल्याने दुसऱ्या मजल्यावर व्यास यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या लोकांमध्ये घबराट पसरली. हा प्रकार अचानक घडल्याने नेमके काय झाले याबाबत तेथील लोकांमध्ये काही वेळेपुरता संभ्रम निर्माण झाला होता. याच मजल्यावर आयुक्तांसह महापौर, उपमहापौर व सभागृह नेत्याचे कार्यालय असल्याने आग पसरण्यापुर्वी प्रसंगावधान राखून आग त्याच कार्यकर्त्यांनी विझवली. यामुळे पुढील दुर्घटना टळली. दरम्यान या अतिउत्साही कार्यकर्त्यांना समज देण्याचे तत्परता कोणीही न दाखवता भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र त्याची सारवासारव करून वेळ मारून नेली. पालिकेने मुख्यालयात आग प्रतिबंध यंत्रणा बसविली असुन परिसरात धूर पसरल्यास ती त्वरीत कार्यान्वित होते. परंतु, या घटनेवेळी ती यंत्रणा सुरूच न झाल्याने ती कुचकामी ठरल्याचे समोर आले. परंतु, मोठी दुर्घटना घडली असती तर काही वर्षांपुर्वी मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेची पालिका मुख्यालयात पुनरावृत्ती झाली असती, अशी चर्चा लोकांमध्ये सुरू झाली होती.