अपुऱ्या मनुष्यबळावर अग्निशमन विभागाचा डोलारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 03:29 AM2018-10-04T03:29:51+5:302018-10-04T03:30:21+5:30
१९९९ मध्ये सुरू झालेल्या अग्निशमन दलात कर्मचारी नियुक्तीसाठी सरकारने केवळ ११ पदांनाच मंजुरी दिली. पुढे वाढती लोकसंख्या व लोकवस्तीच्या प्रमाणात ही सेवा कमी पडू लागल्याने
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अग्निशमन विभागात राज्य सरकारने १०३ पदांना मंजुरी दिली आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात आवश्यक २२४ पदांच्या निर्मितीचा ठराव २०११ मध्ये महासभेत मंजूर केला. राज्य सरकारच्या मान्यतेसाठी हा ठराव प्रशासनाने तब्बल चार वर्षांनी पाठवला. त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
१९९९ मध्ये सुरू झालेल्या अग्निशमन दलात कर्मचारी नियुक्तीसाठी सरकारने केवळ ११ पदांनाच मंजुरी दिली. पुढे वाढती लोकसंख्या व लोकवस्तीच्या प्रमाणात ही सेवा कमी पडू लागल्याने पुरेशा मनुष्यबळाच्या नियुक्तीसाठी अतिरिक्त पदांना मंजुरी मिळावी, याकरिता माजी नगरसेवक मिलन म्हात्रे यांनी २००७ मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली. २००९ मध्ये न्यायालयाने अग्निशमन दलासाठी पुरेशा पदांना मंजुरी देण्याचे आदेश सरकारला दिले. राज्य सरकारने त्यावेळी ९२ पदांना मंजुरी दिली. सध्या या विभागात ८३ स्थायी अधिकारी व कर्मचारी तसेच कंत्राटावर ४२ चालक आहेत. २०११ मधील जनगणनेनुसार मीरा-भार्इंदर शहरांची लोकसंख्या आठ लाख १४ हजार इतकी असली, तरी ती १२ लाखांवर असल्याचे सांगण्यात येत आहे.
सिल्व्हर पार्क येथील केंद्र सुरू आहे, तर उत्तन व मीरा रोड येथील कनाकिया परिसरात असलेल्या केंद्रांत प्रत्येकी दोन वाहने तैनात असून भार्इंदर पश्चिमेकडील कल्पना चावला केंद्रात एकच वाहन तैनात केले आहे. नवघर येथील केंद्र सध्या बंद आहे. सुरू असलेल्या केंद्रांपैकी ६० फूट मार्ग व सिल्व्हर पार्क केंद्रात प्रत्येक पाळीत एक चालक व दोन फायरमन, तर उर्वरित केंद्रांत प्रत्येक पाळीत प्रत्येकी एक चालक व फायरमन तैनात केले जातात.
प्रत्यक्षात एका केंद्रात किमान २५ कर्मचारी तीन पाळ्यांत कार्यरत असणे अपेक्षित असताना तुटपुंज्या मनुष्यबळावर अग्निशमन विभागाचा गाडा हाकला जात आहे.
वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात अग्निशमन दलासाठी मुख्य अग्निशमन अधिकाºयाची वानवा अनेक वर्षांपासून असून तूर्तास त्याचा पदभार प्रभारी अधिकाºयाकडे दिला आहे. सरकारच्या वेळाकाढूपणाबद्दल येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पालिका प्रशासनाने पाठपुरावा करावा अशी मागणी होत आहे.
या पदांचा आहे समावेश
या विभागात कार्यरत असलेल्या स्थायी अधिकारी व कर्मचाºयांखेरीज अतिरिक्त २२४ पदनिर्मितीचा ठराव ३१ आॅक्टोबर २०११ च्या महासभेत मंजूर करण्यात आला. त्यात केंद्र अधिकाºयाची दोन पदे, प्रमुख अग्निशामकाची १० पदे, यंत्रचालक व चालकाची ३५ पदे, चालकाची सात पदे व अग्निशामकांच्या १६९ पदांचा समावेश आहे.
भार्इंदर पालिका : २२४ पदांच्या निर्मितीचा ठराव मंजुरीसाठी सरकारकडे पडून