उल्हासनगरातील हरी ओम बेकरी व प्लास्टिक कारखान्याला आग, लाखोंचे साहित्य खाक
By सदानंद नाईक | Published: July 21, 2023 07:27 PM2023-07-21T19:27:39+5:302023-07-21T19:28:04+5:30
संततधार पावसात आग लागल्याने, आश्चर्य व्यक्त होत आहे.
उल्हासनगर : कॅम्प नं-२ येथील एका प्लास्टिक कारखाना व कॅम्प नं-४ मधील बेकरीला शॉर्ट सर्किट मुळे आग लागून लाखोंचे साहित्य जळून खाक झाले. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने आग विझविली असून संततधार पावसात आग लागल्याने, आश्चर्य व्यक्त होत आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-२, खेमानी परिसरातील रमाबाई आंबेडकरनगर टेकडी येथील एका प्लास्टिक कारखान्याला शुक्रवारी सकाळी १० वाजता आग लागली. महापालिका अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन काही तासात आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत लाखोंचे साहित्य जळून खाक झाले होते. तर दुसऱ्या घटनेत कॅम्प नं-४ संभाजी चौक, पाच दुकान रहिवाशी परिसरातील हरी ओम बेकरीत दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान आग लागली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आग आटोक्यात आणली असून आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य काही काळ निर्माण झाले होते. दोन्ही आगी शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज महापालिका अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांनी व्यक्त केला. आगीत लाखोंचे साहित्य जाळून खाक झाल्याचे नेटके म्हणाले.