भिवंडीतील वळगाव येथील केमिकल गोदामाला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 09:16 AM2019-07-23T09:16:40+5:302019-07-23T09:17:27+5:30
भिवंडीतील वळगाव येथील प्रेरणा कॉम्प्लेक्स मधील एका केमिकल गोदामाला रात्री 1 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली आहे.
भिवंडी - भिवंडीतील वळगाव येथील प्रेरणा कॉम्प्लेक्स मधील एका केमिकल गोदामाला रात्री 1 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली आहे. ही आग विझविण्यासाठी भिवंडी , ठाणे , कल्याण , उल्हासनगर येथील अग्निशमन विभागाच्या गाड्या मागविण्यात आल्या असून, अजूनही आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत . सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे .
प्रेरणा कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या एका केमिकल गोदामाला सुरुवातीला आग लागली असून ही आग भीषण असल्याने केमिकल गोदामाच्या बाजूला असलेल्या डांबर आणि रबरच्या गोदामाला देखील आग लागल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली त्याची अधिकृत माहिती मिळत नसली तरी शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. भिवंडीत केमिकल गोदामे मोठ्या प्रमाणात असून, आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहे. मात्र या आग लागण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाबरोबरच महसूल विभाग अजूनही ठोस भूमिका घेत नसल्याने भविष्यात मोठी जीवित हानी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.