दिव्यात आगडोंब, गोदामे खाक; तीन तासांनतर आग आटोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2022 07:25 AM2022-03-09T07:25:19+5:302022-03-09T07:25:29+5:30
दिव्यातील शीळफाटा-महापे रोडवर एचपी पेट्रोलपंपाजवळ केला कम्पाउंड येथील गोदामाला आग लागल्याची माहिती मिळताच प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, टोरेंट पॉवर वायरमन, शीळफाटा- डायघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दिवा - शीळफाटा - महापे रोडवरील भंगार आणि प्लास्टीकचे साहित्य असलेल्या चार गोदामाला मंगळवारी सकाळी ९ वाजता आग लागली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. ही आग तीन तासांनी आग आटोक्यात आल्याची माहिती आपत्ती निवारण कक्षाने दिली.
दिव्यातील शीळफाटा-महापे रोडवर एचपी पेट्रोलपंपाजवळ केला कम्पाउंड येथील गोदामाला आग लागल्याची माहिती मिळताच प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, टोरेंट पॉवर वायरमन, शीळफाटा- डायघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र, गोदाम पत्र्याचे असल्याने आणि त्यामध्ये भंगार आणि प्लॅास्टिक साहित्य असल्याने आगीने काही क्षणात रौद्र रूप घेतले. या आगीत भंगार आणि प्लॅास्टिकचे साहित्य जळून खाक झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्रशासनाची तत्परता
घटनेची माहिती मिळताच ठामपाचे दोन फायर इंजिन, एक रेस्क्यू वाहन आणि दोन पाण्याचे टँकर, रबाळे एमआयडीसी फायर ब्रिगेडचे एक फायर इंजिन पाचारण करण्यात आले होते. या आगीत दोन कापसाचे कचरा साहित्य आणि दोन प्लॅास्टिकचे भंगार साहित्य असे चार गोदामे जळून खाक झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी यावेळी दिली.