भिवंडी तालुक्यातील खोणी येथे प्लॅस्टिक मणी बनवण्याच्या कारखान्यास भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 05:54 PM2021-02-10T17:54:07+5:302021-02-10T17:54:30+5:30
प्लास्टिक मणी बनविण्याच्या कारखान्यास बुधवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
भिवंडी: भिवंडी शहरा नजीकच्या खोणी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मच्छा कंपाऊंड येथे प्लास्टिक मणी बनविण्याच्या कारखान्यास बुधवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला असून ही आग भयंकर असल्याने आगीच्या ज्वाळांनी सिमेंटचे पत्रे उडाले असल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
तर या आगीच्या ज्वाळांनी नजीकच्या गोदामात साठवून ठेवलेले प्लास्टिकचे मणी असलेला साठा सुद्धा जळून खाक झाला आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होत या आगीवर सुमारे दीड तासात नियंत्रण मिळवले आहे. तर कारखान्यां मध्ये काम करणारे तब्बल दहा कामगार यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत कारखान्या बाहेर पळ काढल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.
आगीचं कारण अजून स्पष्ट नसले तरी सुद्धा प्लास्टिक मणी बनवण्याच्या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर केमिकल चा साठा असल्याने त्या केमिकल ने पेट घेतल्याने या आगीने रौद्र रूप धारण केले होते .त्यानंतर सुमारे तीन तासाने या आगीवर पूर्ण नियंत्रण मिळविले आहे .
खोणी भागात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक मणी बनविण्याचे कारखाने आहेत परंतु त्यांच्याकडे अग्नी सुरक्षेची कोणतीही उपाययोजना नसल्याने या आगीत इतरांचेही नुकसान होत असून होणाऱ्या प्रदूषणा कडे प्रदूषण नियंत्रण महामंडळ दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे .