आठ मैदानांत फटाक्यांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 12:02 AM2018-11-03T00:02:54+5:302018-11-03T00:03:19+5:30
ठाण्यात स्टॉलचा मार्ग मोकळा; अग्निशामक दलही सज्ज
ठाणे : दिवाळीसाठी परिसराची सुरक्षा लक्षात घेऊन ठाणे महापालिकेच्या अग्निशामक दलाने यंदा आठ मैदानांत फटाकेविक्रीची परवानगी दिली आहे. तसेच आगीच्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सहा स्थायी अग्निशमन केंदे्र, चार बीट फायर स्टेशन आणि पाच विशेष वाहने तैनात केली आहेत. सहा स्थायी अग्निशमन केंद्रांव्यतिरिक्त नऊ अग्निशामक केंदे्र येत्या सोमवार, ५ नोव्हेंबरपासून सुरू होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मागील काही वर्षांपासून स्टॉलसाठीदेखील मोकळे भूखंड आणि मैदाने देण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला त्यासाठी भाडे आकारले जात नव्हते. परंतु, मागील दोन वर्षांपासून त्यांच्याकडून दोन हजार रु पये भाडे आकारण्यास सुरुवात झाली. परंतु, त्यासाठी काही अटीदेखील टाकल्या आहेत. त्यानुसार, अग्निशामक विभागाकडून आग विझवण्याचा एक बाटला घ्यावा. स्टॉलची उभारणी पत्र्यांची असावी आणि मातीच्या दोन बादल्या प्रत्येक स्टॉलधारकाने ठेवाव्यात, यांचा समावेश आहे. तसेच ज्या ठिकाणी वीसहून अधिक स्टॉल्स असतील, त्याठिकाणी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांसाठीदेखील एक तंबू उभारला जात आहे. त्याच्या बाजूला अग्निशामक दलाचे दोन कर्मचारी तैनात असतील. याशिवाय, आग लागू नये, या उद्देशाने प्रत्येक स्टॉलचालकाने २०० लीटरचा पाण्याचा ड्रम भरून ठेवणे बंधनकारक केले आहे. तसेच १० प्रभाग समित्यांच्या सहायक आयुक्तांना आग लागल्यास काय करावे आणि काय करू नये, यासंदर्भातील ३३ प्रकारच्या सूचना केल्याचे अग्निशामक दलाचे प्रमुख शशिकांत काळे यांनी सांगितले.
कोपरीत नऊ गाळेधारकांना परवानगी
ठाण्यात फटाक्यांचे मोठे मार्केट म्हणून कोपरीच्या मार्केटकडे पाहिले जाते. याठिकाणी दिवाळीच्या १० दिवस आधीपासून फटाके खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडालेली असते. येथील १४ पैकी नऊ गाळेधारकांना नाहरकत प्रमाणपत्र अटीशर्तीनुसार दिले.
काही वर्षांपूर्वी येथे दाटीवाटीने फटाक्यांची दुकाने होती. विशेष म्हणजे २० किलोचा तात्पुरता परवाना घेऊन १०० किलोहून अधिकचे फटाके ठेवले जात होते. मात्र, आता येथे ज्यांच्याकडे कायमस्वरूपी फटाक्यांचा परवाना आहे, त्यांचेच स्टॉल लावण्यास परवानगी देण्याचे निश्चित केले.