ठाणेकरांचं जीवन गॅसवर? आगीच्या घटनांमध्ये सात वर्षांत दुप्पट वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 11:44 PM2020-01-11T23:44:58+5:302020-01-11T23:45:10+5:30
शहराची आजची लोकसंख्या २३ लाखांच्या घरात आहे. लोकसंख्येच्या मानाने आजघडीला १४ अग्निशमन केंद्रांची आवश्यकता असताना शहरात केवळ सात केंद्रे आहेत.
ठाणे : वाढती लोकसंख्या आणि वाढत्या शहरीकरणाबरोबरच ठाणे शहरात मागील सात वर्षांत आगीच्या घटनांमध्येही तिपटीने वाढ झाली आहे. २०१३ मध्ये शहरात ३३२ आगीच्या घटना घडल्या होत्या. २०१८ मध्ये तब्बल ८४२ घटना घडल्या, तर २०१९ मध्ये आगीच्या ७८२ घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे एकीकडे आगीबाबत विविध सोसायट्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याचा दावा केला जात आहे. परंतु, असे असतानाही या वाढत्या घटनांमध्ये ठाणे आता आगी लागण्याचे केंद्र बनते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
शहराची आजची लोकसंख्या २३ लाखांच्या घरात आहे. लोकसंख्येच्या मानाने आजघडीला १४ अग्निशमन केंद्रांची आवश्यकता असताना शहरात केवळ सात केंद्रे आहेत. तर, लोकसंख्येच्या मानाने या अग्निशमन केंद्रांसाठी ४३५ जणांचा स्टाफ आवश्यक असतानादेखील ३४० अधिकारी, कर्मचारी आहेत. पर्यवेक्षक, तांडेल, वाहनचालक आणि फायरमन यांची कित्येक पदे रिक्त आहेत. एका अग्निशमन केंद्रासाठी तीन पाळ्यांमध्ये ३२ अधिक सहा असे ३८ कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ आवश्यक आहे. परंतु, सध्या प्रत्येक केंद्रावर मनुष्यबळाची वानवा आहे.
असे असताना २०१३ पासून ते आजघडीला शहराची लोकसंख्याही वेगाने वाढत आहे. वाहनांची संख्याही वेगाने वाढत आहे. परंतु, शहराचा आवाका वाढत नाही. मात्र, आगीच्या घटना वेगाने वाढत आहेत. नव्या इमारतींना एनओसी देताना दोन जिन्यांची गरज आवश्यक केली आहे. परंतु, त्याची योग्य ती दखल घेतली जाते का? हादेखील प्रश्न आहे.
ठाणे शहरात २०१३ मध्ये आगीच्या ३३२ घटना घडल्या आहेत. २०१४ मध्ये त्यात वाढ होऊन त्यांची संख्या ५०४ एवढी झाली. तर, २०१५ मध्ये ५१३ तसेच २०१६ मध्ये मात्र आगीच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून आले. या वर्षभराच्या कालावधीत ३९५ आगीच्या घटना घडल्या आहेत. तर, २०१७ मध्ये पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या कालावधीत ६०४, सन २०१८ मध्ये ८४२ तर २०१९ मध्ये आगीच्या घटनांमध्ये काहीशी घट होऊन ही संख्या ७८२ एवढी दिसून आली आहे.