Fire News: जीन्स पॅन्ट कारखान्याला आग, लाखोंचे कपडे अन् मशीन जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 06:57 PM2022-02-27T18:57:25+5:302022-02-27T18:58:45+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-५ तानाजी नगर, जय जनता कॉलोनी येथील एका जीन्स पॅन्ट कारखान्याला रविवारी सकाळी ६ च्या दरम्यान आग लागली
सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-५ तानाजी नगर येथील जीन्स पॅन्ट कारखान्याला रविवारी सकाळी ६ वाजता आग लागून लाखो किमतीचे जीन्स पॅन्ट व मशीन जळून खाक झाली. पालिका अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन काही तासात आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.
उल्हासनगर कॅम्प नं-५ तानाजी नगर, जय जनता कॉलोनी येथील एका जीन्स पॅन्ट कारखान्याला रविवारी सकाळी ६ च्या दरम्यान आग लागली. आगीने स्थानिक नागरिकांची धावपळ उडून आग इतरत्र पसरण्याची भीती निर्माण झाली. मात्र काही वेळेत महापालिका मुख्य अग्निशमन अधिकारी बाळासाहेब नेटके यांच्यासह त्यांचे सहयोगी कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचे कसोशीने प्रयत्न केले. मात्र काही तासात आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत जीन्स कारखान्यातील जीन्स पॅन्ट, जीन्स कपडा यांच्यासह कारखान्यातील मशीन असा एकून लाखोंचे साहित्य जळून खाक झाले. ओमप्रकाश प्रजापती यांच्या मालकीच्या या कारखान्यात ५० हुन अधिक मशिन्स व लाखो रुपयांचे जीन्सचे तागे असल्याचे बोलले जाते. आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचा प्राथमिक अंदाजमुख्य अग्निशमन अधिकारी बाळासाहेब नेटके यांनी व्यक्त केला. सुदैवाने रविवार सुट्टी असल्याने कारखान्यात कोणी नसल्याने जीवितहानी झाली नाही. अधिक तपास हिललाईन पोलीस करीत आहेत.