रात्री बारानंतरही अग्निशमन कार्यालये अलर्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:39 AM2021-09-13T04:39:30+5:302021-09-13T04:39:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : केडीएमसीच्या अग्निशमन केंद्राचे मुख्य कार्यालय आधारवाडीला आहे. याशिवाय डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरातील अग्निशमन केंद्रालाही विशेष ...

Fire offices alert after night rain! | रात्री बारानंतरही अग्निशमन कार्यालये अलर्ट!

रात्री बारानंतरही अग्निशमन कार्यालये अलर्ट!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : केडीएमसीच्या अग्निशमन केंद्राचे मुख्य कार्यालय आधारवाडीला आहे. याशिवाय डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरातील अग्निशमन केंद्रालाही विशेष महत्त्व आहे. शनिवारी रात्री १२.३० वाजता या कार्यालयाला अचानक भेट दिली असता कर्मचारी अलर्ट असल्याचे दिसून आले; परंतु कर्मचारी पुरेसे नव्हते. त्यामुळे संबंधित कर्मचारी अलर्ट दिसत असले तरी, एखादी मोठी घटना घडल्यास अन्य केंद्रांतून कर्मचारी आयात करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे स्पष्ट होत आहे.

एमआयडीसीतील अग्निशमन केंद्र १९८३ साली सुरू झाले. प्रारंभी एमआयडीसीची गरज म्हणून उभारलेल्या या केंद्रातून कालांतराने संपूर्ण शहरात आणि आजूबाजूच्या भागांमध्ये सेवा दिली जात आहे. केंद्रावर उपस्थानक अधिकारी, लिडिंग फायरमन, ड्रायव्हर कम ऑपरेटर, सहा फायरमन असे नऊ जण एका शिफ्टमध्ये असणे गरजेचे आहे. याठिकाणी पुरेसे कर्मचारी असल्याचा दावा अधिकारी करत असले तरी, कर्मचाऱ्यांअभावी ऐनवेळी अन्य केंद्रांतून कर्मचारी मागवावे लागतात ही वस्तुस्थिती आहे. संबंधित केंद्र धोकादायक झाल्याने ते अन्यत्र हलविण्यात येणार आहे. मात्र, दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी केंद्र स्थलांतर करायला मुहूर्त मिळालेला नाही. रात्रपाळीचे काम रात्री १० ते सकाळी सहापर्यंत चालते. दरम्यान, शनिवारी केंद्राला भेट दिली असता त्याठिकाणी सहा कर्मचारी आढळून आले. सध्या गणेशोत्सवाच्या धर्तीवर केंद्राच्या कर्मचाऱ्यांना तलाव, खाडीकिनारी तैनात करण्यात आले आहे. आधीच अपुऱ्या मनुष्यबळात उपलब्ध कर्मचाऱ्यांची कसरत होत असताना अतिरिक्त बंदोबस्ताची भर पडली आहे.

------------------------------------------

तयार स्थितीत तीन बंब

केंद्राच्या ठिकाणी पाच बंब आहेत. परंतु ड्रायव्हर कम ऑपरेटरची कमतरता असल्याने सध्या तीनच बंब वापरात आहेत. रात्रपाळीत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये ड्रायव्हर कम ऑपरेटर तैनात असल्याचे दिसून आले. दरम्यान, एका बंब गाडीवर साधारण नऊ कर्मचारी लागतात. मात्र, मनुष्यबळ नसल्याने चार ते पाच कर्मचारीच उपलब्ध होतात. बंबावरची शिडी ऑपरेट करायलाच चार कर्मचारी लागतात. त्यामुळे आग असो अथवा अन्य कॉल अटेंड करताना कर्मचाऱ्यांची दमछाक होते.

-----------------------------------------

वॉचरूम ऑपरेटरची वानवा

एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात रासायनिक कंपन्या आहेत. दरवर्षी सात ते आठ कंपन्यांना मोठ्या आगी लागतात. इतरही आगींचे ३०० ते ५०० कॉल या केंद्रात येतात. कॉल स्वीकारायला स्वतंत्र वॉचरूम ऑपरेटर नेमलेला नाही. त्यामुळे शिफ्टमध्ये उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांनाच वॉचरूमची भूमिकाही बजवावी लागत आहे.

--------------------------

कर्मचारी पुरेसे असल्याचा दावा

एका केंद्रावर सहा कर्मचारी असणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे डोंबिवली केंद्रावर पुरेसे कर्मचारी होते, असे म्हणणे उचित ठरेल. सब ऑफिसरची जागा रिक्त आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आता मनपाची नवीन सूची नुकतीच जाहीर झाली आहे. त्याप्रमाणे ते रिक्त पदही भरले जाईल.

- नामदेव चौधरी मुख्य अग्निशमन अधिकारी, केडीएमसी

--------------------------------------------

फोटो आनंद मोरे

Web Title: Fire offices alert after night rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.