बदलापूरमध्ये ओंकार केमिकल कंपनीला आग, नऊ कामगार जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 01:40 AM2019-11-27T01:40:31+5:302019-11-27T01:41:18+5:30
बदलापूर माणकिवली गावाला लागून असलेल्या एमआयडीसीच्या केमिकल झोन परिसरातील ओंकार केमिकल कंपनीला मंगळवारी दुपारी भीषण आग लागली.
बदलापूर : बदलापूर- माणकिवली गावाला लागून असलेल्या एमआयडीसीच्या केमिकल झोन परिसरातील ओंकार केमिकल कंपनीला मंगळवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत कंपनीत काम करणारे नऊ कामगार भाजले आहेत. तर या आगीत संपूर्ण कंपनी नष्ट झाली. या कारखान्यात अत्यंत ज्वलनशील रसायन असल्याने ही आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत होती. अखेर तीन तासांच्या प्रयत्नानंतर ती आटोक्यात आली.
बदलापूर एमआयडीसी भागातील ओंकार केमिकल कंपनीत दुपारी अचानक आग लागली. या आगीनंतर कंपनीमधील बॉयलरचाही स्फोट झाला. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात वाढली. या कंपनीत प्रक्रियेसाठी आणलेले घातक रसायन मोठ्या प्रमाणात असल्याने ही आग आणखी भडकली. आगीची माहिती मिळताच बदलापूर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्या पाठोपाठ अंबरनाथ एमआयडीसी, कल्याण- डोंबविली महापालिका, अंबरनाथ नगरपालिका, उल्हासनगर महापालिकेची गाडी घटनास्थळी दाखल झाली.
तीन तास प्रयत्न केल्यावर आगीवर नियंत्रण मिळवता आले. आग विझविण्याच्या कामात बदलापूरमधील अनेक टँकरची मदत घेण्यात आली. त्यामुळे ही आग विझविण्यासाठी कमी कालावधी लागला. मात्र या आगीत कंपनीत काम करणारे नऊ कामगार भाजले. दोन कामगार गंभीर तर सात कामगार किरकोळ भाजले आहेत. गंभीर भाजलेल्या रूग्णांना लागलीच नवी मुंबई आणि मुंबईच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर काहींना बदलापूरच्या स्थानिक रूग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान, कंपनीला आग लागल्यावरही आग पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. प्रत्येकजण बघ्याच्या भूमिकेत या ठिकाणी उभे होते. तर काहीजण केवळ चित्रीकरण करण्यात व्यस्त होते. बघ्यांच्या गर्दीमुळे आग विझविण्यात अडचणी येत होत्या. अखेर पोलिसांनी बघ्यांना हुसकावून लावले.