अग्निशमन दलातील फायर फायटींगच्या वाहनांची दुरुस्ती लटकली, महासभेत उघड झाली बाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 03:10 PM2018-12-27T15:10:18+5:302018-12-27T15:11:49+5:30
अग्निशमन विभागाच्या अत्याधुनिक स्वरुपातील दोन फायर फायटींग वाहने बंद अवस्थेत असल्याची बाब महासभेत उघड झाली आहे. परंतु ही वाहने लवकरात लवकर दुरुस्त केली जातील असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
ठाणे - ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागातील उंच इमारतीला आग लागल्यास ती विझविण्यासाठी अत्याधुनिक स्वरुपाची असलेली दोन वाहने तब्बल सहा महिन्यापासून बंद अवस्थेत असल्याची माहिती बुधवारी झालेल्या महासभेत समोर आली आहे. त्यामुळे अग्निशमन विभागाच्या नवीन वाहने घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी कशी द्यायची असा सवाल सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला.
ठाणे शहरात आजच्या घडीला मोठ मोठी गृहसंकुले उभी राहत आहेत. त्यामुळे या ठिकाणी एखाद्या वेळेस आग लागल्यास ती विझविण्यासाठी अग्निशमन विभागाकडून अत्याधुनिक फायर फायटींगची वाहने खरेदी करण्यात आली आहेत. परंतु ही वाहने नादुरुस्त असल्याची माहिती सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी सभागृहात दिली. त्यामुळे एखाद्या वेळेस आगीची घटना घडली तर ती आग कशी विझविली जाणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ही वाहने केव्हापासून बंद अवस्थेत ती दुरुस्त का केली जात नाहीत? असे अनेक प्रश्न उपस्थित करुन त्यांनी प्रशासनाला अडचणीत आणले होते. त्यानुसार वाहन विभागाचे अधिकाऱ्यांनी यातील एक वाहन सहा महिन्यापासून बंद असल्याची कबुली दिली. तर दुसरे वाहन हे दिड महिन्यापासून बंद असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे सभागृहातील वातावरण आणखीच तापले. असे असतांना आम्ही नवीन वाहन खरेदीला मंजुरी का द्यायची असा सवालही म्हस्के यांनी उपस्थित केला. ७ डिसेंबरला सुध्दा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने यातील एक वाहन वापरले गेले होते. परंतु त्याची शिडी अर्ध्यावरच अडकली होती. त्यामुळे एखादी दुर्घटना घडली आणि अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवालही यावेळी सदस्यांनी उपस्थित केला.
वास्तविक पाहता ही वाहने खरेदी केल्यानंतर त्याची निगा देखभालीबाबत कोणत्याही तरतूद न करण्यात आल्यानेच या वाहनांची दुरुस्ती रखडली असल्याचेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. त्यावरुन सुध्दा प्रशासनावर सदस्यांनी आगपाखड केली. परंतु नवीन वाहन खरेदी करतांनाच त्या वाहनांची निगा देखभालीचाही समावेश करण्यात आल्याचे प्रशासाने सांगितले. तसेच दुरुस्तीसाठी उभी असलेले एक वाहनसुध्दा लवकरात लवकर दुरुस्त केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. अखेर हा प्रस्ताव मंजुर करण्यात आला.