अग्निसुरक्षा पुन्हा रडारवर, ३८४ रुग्णालयांची पुन्हा तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 05:04 AM2018-12-20T05:04:37+5:302018-12-20T05:04:52+5:30

३८४ रुग्णालयांची पुन्हा तपासणी : मुंबईच्या दुर्घटनेनंतर महापालिकेने दिले आदेश

Fire safety again on radar, 384 hospitals re-examined | अग्निसुरक्षा पुन्हा रडारवर, ३८४ रुग्णालयांची पुन्हा तपासणी

अग्निसुरक्षा पुन्हा रडारवर, ३८४ रुग्णालयांची पुन्हा तपासणी

Next

ठाणे : मुंबईतील कामगार रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत आठ जणांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक जण जखमी झाले. या दुर्दैवी घटनेनंतर सर्वच भागांतील रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ठाणे महापालिका हद्दीतही ३८४ खाजगी रुग्णालये पुन्हा अग्निसुरक्षेच्या रडारवर आली आहेत. महापालिकेच्या मुख्य अग्निशमन विभागाने त्यांची तपासणी करण्याचे निर्देश दिले असून ३१ डिसेंबरपर्यंत अहवाल मागवला आहे.

दरम्यान, २५ ते ३० वर्षांपेक्षा जास्त जुन्या रुग्णालयांविरोधात अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र, वापरात बदल अशा कागदपत्रांच्या कात्रीत अडकलेल्या रुग्णालयांची मुक्तता करण्याचा निर्णय महापालिकेने यापूर्वीच घेतला आहे. कारण, आरोग्य सेवा संचालनालयाने हॉस्पिटलची नोंदणी किंवा पुनर्नोंदणी करताना अग्निशमन दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) सक्तीचे केले असले, तरी नर्सिंग होम अ‍ॅक्टमध्ये अशी एनओसी किंवा वापर बदलाबाबतचा उल्लेख नाही. कायद्यातील याच मुद्यावर बोट ठेवून महापालिकेने शासनाच्या परिपत्रकाला यापूर्वीच केराची टोपली दाखवून एप्रिल २०१८ पासून आतापर्यंत ३८४ खाजगी रुग्णालयांपैकी ३७२ रुग्णालयांची नोंदणी पूर्ण करून उर्वरित रुग्णालयांचे प्रस्तावही येत्या काही दिवसांत मार्गी लागतील, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. परंतु, मुंबईच्या दुर्घटनेनंतर अग्निसुरक्षेची तपासणी पुन्हा करण्याचे काम हे अग्निशमन विभागास सांगण्यात आले आहे.

शहरात किती रुग्णालये आहेत, याची यादी २० डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी शशिकांत काळे यांनी दिले आहेत. तसेच या हॉस्पिटलची पुन्हा तपासणी करून त्यासंदर्भातील अहवाल ३१ डिसेंबरपर्यंत सादर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे जी रुग्णालये अहवाल सादर करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच आलेल्या अहवालाच्या माध्यमातून काही बाबी समोर आल्यास संबंधितांना नोटीस बजावून त्या बाबी दुरुस्त करण्याची मुभा दिली जाणार आहे. त्यानंतरच पुढील कारवाई निश्चित केली जाईल, असेही काळे यांनी स्पष्ट केले.

केडीएमसीच्या रुग्णालयांनाही धोका

‘शास्त्रीनगर’मध्ये यंत्रणेचे नूतनीकरण : अग्निरोधक यंत्रणा सुरु असल्याचा पालिकेचा दावा

प्रशांत माने

कल्याण : अंधेरी येथील कामगार रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेमुळे अन्य रुग्णालयांच्या सुरक्षेचा मुद्दाही चव्हाट्यावर आला आहे. केडीएमसीच्या कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयातील अग्निसुरक्षा जुन्या अग्निरोधक यंत्रणेवर अवलंबून आहे. परंतु, डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात मात्र नव्याने अग्निरोधक यंत्रणा बसवली आहे. दोन्ही ठिकाणची यंत्रणा चालू असल्याचा दावा केडीएमसी प्रशासनाने केला असला तरी रुग्णालयातील जुन्या व जीर्ण झालेल्या विद्युतवायरींचा पडलेला विळखा पाहता भविष्यात आगीचा धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
केडीएमसीची रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर ही दोन मोठी, तर चार लहान रुग्णालये आहेत. तसेच १२ आरोग्य केंद्रे आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांच्या आणि पुरेशा कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे बहुतांश वेळा गंभीर स्वरूपातील रुग्णांना ठाणे, मुंबईतील रुग्णालयाची वाट धरावी लागत आहे. असे असले तरी शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभागामध्ये प्रतिदिन उपचारासाठी येणाºया रुग्णांची संख्या हजार ते बाराशेच्या आसपास असते. पावसाळ्यात हा आकडा दीड हजारांपर्यंत जातो. डॉक्टरांच्या कमतरतेमुळे बहुतांश विभाग बंद असले तरी सध्या दोन्ही रुग्णालयांमध्ये प्रसूती, पुरुष आणि महिला रुग्ण विभाग अविरतपणे सुरू आहे. शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा यंत्रणेची व्यवस्था पाहता दोन्हीकडे अग्निरोधक यंत्रणा बसवली आहे. शास्त्रीनगर रुग्णालयाची यंत्रणा नुकतीच बदलण्यात आली आहे. या दुमजली रुग्णालयामधील प्रत्येक मजल्यावर आठ ते दहा अग्निरोधक यंत्रे बसवली आहेत. केडीएमसीच्या विद्युत विभागाकडून ही यंत्रणा बसवली असून रुग्णालयातील कर्मचाºयांना याबाबतचे प्रशिक्षणही दिल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, रुग्णालयातील जुन्या आणि जीर्ण विद्युतवायरींमुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रुक्मिणीबाई रुग्णालयामधील स्थितीही ‘जैसे थे’ आहे. तेथील अग्निरोधक यंत्रणा मात्र बदललेली नाही. मध्यंतरी, एका किरकोळ घटनेच्यावेळी ही यंत्रणा वापरली गेल्याने ती चालू स्थितीत असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. त्याचप्रमाणे जर एखादी दुर्घटना घडली, तर बाहेर पडण्यासाठी चार मोठे प्रवेशद्वार रुक्मिणीबाई रुग्णालयात असल्याचेही सांगितले जाते. रुग्णालयातील वायरिंग जुनी असली तरी येथे भंगार तसेच अन्य अडगळीचे सामान नसल्याने आगीसारख्या घटना घडण्याची शक्यता नाही, असा दावाही केला जात आहे. दरम्यान, येथील जुनी यंत्रणा बदलावी तसेच फायर अ‍ॅक्टप्रमाणे तपासणी करावी, असे पत्र अग्निशमन विभागाला दिल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

‘रुक्मिणीबाई’मध्येही लवकरच नवीन यंत्रणा
केडीएमसी हद्दीतील महापालिकेच्या सर्वच कार्यालयांमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसवण्याचे काम सुरू आहे. डोंबिवलीत काम सुरू करण्यात आले असून तेथील शास्त्रीनगर रुग्णालयात यंत्रणा नव्याने बसवली आहे. कल्याणमधील निविदा प्रकि या अंतिम टप्प्यात असून तेथील रुक्मिणीबाई रु ग्णालयातही लवकरच नवीन यंत्रणा बसवली जाईल, अशी माहिती केडीएमसी विद्युत विभागाचे यशवंत सोनवणे यांनी दिली.

‘त्या’ दुर्घटनेनंतर
फायर आॅडिट
डिसेंबर २०१७ मध्ये घडलेल्या कमला मिल दुर्घटनेनंतर महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांचे फायर आॅडिट करण्यात आले होते. महापालिकेच्या रुग्णालयांमधीलदेखील अग्निरोधक यंत्रणांची तपासणी करण्यात आली आहे. रुग्णालयातील जुन्या वायरीही बदलण्यात येतील, अशी माहिती केडीएमसीचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजू लवंगारे यांनी दिली.

 

Web Title: Fire safety again on radar, 384 hospitals re-examined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.