मीरारोड रेल्वे स्थानकातील निर्माणाधीन तिकीट घराच्या इमारतीला आग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 01:19 PM2018-07-03T13:19:25+5:302018-07-03T13:20:44+5:30
अंधेरी येथील रेल्वे मार्गावर पादचारी पूल कोसळल्याच्या घटनेपाठोपाठ मीरारोडच्या तिकीट घरचे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत आग लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मीरा रोड - अंधेरी येथील रेल्वे मार्गावर पादचारी पूल कोसळल्याच्या घटनेपाठोपाठ मीरारोडच्या तिकीट घरचे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत आग लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मीरा रोड रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला चर्चगेटच्या दिशेकडे जुने तिकीट घर आहे. सदर तिकीट घराच्या मागील बाजूस नवीन एक मजली तिकीट घराचे काम सुरू आहे. सदर निर्माणाधीन इमारतीच्या तळमजल्यावर पीव्हीसी पाईप ठेवण्यात आले होते. सकाळी ८.४०च्या सुमारास या पाईपना आग लागली. पीव्हीसी पाईपने पेट घेताच मोठ्या प्रमाणात धूर व ज्वाळा उसळल्या. यामुळे रेल्वे स्थानकातील प्रवाशी व परिसरातील नागरिकांमध्ये घबराट माजली. तेथील रेल्वेचे कर्मचारी व रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अखेर तिकीट घरात असलेल्या अग्निशामक यंत्राने आग विझवण्यात आली. आग काही वेळातच विझवण्यात आल्याने बऱ्याच पाईपचे नुकसान टळले. या आगीची वर्दी पालिकेच्या अग्निशमन दलाकडे नव्हती. सोशल मीडियावर आगीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळाची पाहणी केली. या ठिकाणी असलेल्या पाईपना आग चुकून लागली की लावली हे स्पष्ट झालेले नाही.