प्लास्टिकच्या रॉ मटेरियलला आग; आगीत मोठे नुकसान, साहित्य जळून खाक
By अजित मांडके | Published: September 28, 2022 11:00 AM2022-09-28T11:00:00+5:302022-09-28T11:02:14+5:30
शीळ येथील मुनीर कंपाऊंड येथे नुरुल्ला खान पठाण यांचा १२०० स्क्वेअर फूटाचा गाळा आहे. तेथे मे. फॅब्रिकेशन मटेरियल अँड मॅन्युफॅक्चरिंगचे काम चालते.
ठाणे : शिळ, महापे रोडवरील पेट्रोल पंप जवळ, मुनिर कंपाऊंड, ठाकूर पाडा येथे मशिनरी,पॅकिंग व प्लास्टिकचे रॉ मटेरियलला आग लागल्याची घटना बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत प्लास्टिकचे रॉ मटेरियल व इतर साहित्यही जळून खाक झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झालेली नाही. तर,आगीवर नियंत्रण मिळविण्यात मुंब्रा अग्निशमन दलाच्या जवानांना यश आल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
शीळ येथील मुनीर कंपाऊंड येथे नुरुल्ला खान पठाण यांचा १२०० स्क्वेअर फूटाचा गाळा आहे. तेथे मे. फॅब्रिकेशन मटेरियल अँड मॅन्युफॅक्चरिंगचे काम चालते. त्या कामासाठी तेथे मशिनरी, पॅकिंग व प्लास्टिकचे रॉ मटेरियल आणले होते. त्याला बुधवारी पहाटे आग लागली. या आगीची माहिती मिळताच, घटनास्थळी डायघर पोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली होती. तर लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी पूर्णपणे नियंत्रणात आणल्यावर परिस्थिती आटोक्यात आली. या आगीमुळे गाळ्यामधील मशिनरी व पॅकिंग व प्लास्टिक चे रॉ मटेरियल जळून नुकसान झाले आहे. तर या घटनेत कोणतीही जीविहानी किंवा कोणालाही दुखापत झालेली नाही. तसेच ही आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी १- फायर वाहन, १- रेस्क्यू वाहन, १- वॉटर टँकर पाचारण केले होते अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.