टिळकनगरमध्ये महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 05:10 PM2020-04-02T17:10:01+5:302020-04-02T17:10:14+5:30
वातावरणात उष्मा वाढला असल्याने ही आग लागली असण्याची शक्यता
डोंबिवली: टिळकनगर येथील महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. त्यातील तेलाने आगीचा भडका अधीक उडाला, त्यामुळे स्फोटासारखे आवाज झाल्याने परिसरातील नागरिक घाबरले होते. त्या अपघातात कोणतीही जिवितहानी मात्र झाली नाही.
आधीच लॉकडाऊन असल्याने नागरिक घरामध्ये होते, त्यात ट्रान्सफॉर्मरला आग लागली तरीही बाहेर जायचे की नाही या विचाराने अनेकांनी घरी बसणे पसंत केले. अखेरीस स्थानिक लोकप्रतिनिधींनी, जागरुक नागरिकांनी यासंदर्भात अग्नीशमन दलाला कळवले. त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन अल्पावधीत आग विझवण्यात आली. त्यावेळी महावितरणचे कर्मचारी, अधिकारीही तेथे आले होते. त्यामुळे काही काळ परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता.
आग लागल्याने ट्रान्सफॉर्मरमधील तेल उकळले होते ते थंड होण्यासाठी काही काळ जावा लागणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने अग्नीशमन दलाचा बंब, कर्मचारी घटनास्थळीच थांबले होते. वातावरणात उष्मा वाढला असल्याने ही आग लागली असण्याची शक्यता सांगण्यात आली.