खासगी नर्सिंग होममध्ये होऊ शकते अग्निकांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 11:45 PM2021-01-09T23:45:52+5:302021-01-09T23:46:07+5:30

भंडारा दुर्घटनेची धास्ती : महापालिका इस्पितळे गोरगरिबांकरिता; दीड कोटी लोकसंख्येकरिता सरकारी सेवाच नाही

Fires can occur in private nursing homes | खासगी नर्सिंग होममध्ये होऊ शकते अग्निकांड

खासगी नर्सिंग होममध्ये होऊ शकते अग्निकांड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
ठाणे, कल्याण : ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये मुंबईसारखी सर्व सुविधांनी युक्त राज्य सरकारी इस्पितळे उभारण्याचे गेल्या कित्येक वर्षांपासून सरकारच्या गावी नाही. त्यामुळे तेथील वैद्यकीय सुविधा, इस्पितळांचे फायर ऑडिट वगैरे बाबी गैरलागू आहेत. ठाणे शहरासह वेगवेगळ्या शहरांमधील महापालिकांनी त्यांच्या क्षेत्रात उभारलेल्या इस्पितळांची अवस्था फारशी चांगली नाही. किंबहुना त्यामुळेच खासगी नर्सिंग होम व अत्यंत महागड्या पंचतारांकित इस्पितळांच्या भरवशावर ठाणे जिल्ह्यातील दीड कोटी लोकसंख्येला अवलंबून राहावे लागत आहे.
       भंडारा येथील सिव्हिल रुग्णालयात बालकांच्या कक्षात लागलेल्या भीषण आगीत होरपळून, गुदमरून १० बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील महापालिका व सिव्हिल इस्पितळांचा आढावा घेतला असता चित्र फारसे समाधानकारक नाही.
      ठाण्यातील सिव्हिल रुग्णालय सध्या कोविड रुग्णालय आहे. येथील प्रसूती वॉर्ड कळवा रुग्णालयात हलवण्यात आला आहे. राज्यात सर्वप्रथम ठाणे सिव्हिल कोविड रुग्णालय म्हणून सुरू झालेले आहे,असे येथील जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. कैलाश पवार व डाॅ. अशोक कांबळे यांनी सांगितले.
           कळवा रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा उत्तम स्थितीत आहे. त्यांचे ऑडिटही नुकतेच केलेले आहे. येथे दिवसाकाठी २५ ते ३० महिलांची प्रसूती होते. येथे बालकांचे एनआयसीयूचे ३० बेड आहेत, तर २० क्युपाईड आहेत. सिव्हिलचा भर या रुग्णालयावर पडलेला असला तरी उत्तम उपचार दिले जात आहेत. रुग्णालयात सुरक्षेच्या दृष्टीने वेळोवेळी दक्षतेच्या उपाययोजना हाती घेतल्या जातात, असे कळवा रुग्णालयाचे डीन डॉ. भीमराव जाधव यांनी लोकमतला सांगितले.

केडीएमसी हद्दीतील रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर या दोन्ही इस्पितळांचे फायर व स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी सांगितले. या ठिकाणी दुर्दैवाने आग लागण्याची घटना घडल्यास रुग्णांना बाहेर काढण्याकरिता मोकळी जागा आहे. तसेच अग्निरोधक यंत्रणा उपलब्ध आहे. मात्र ही इस्पितळे या दोन्ही शहरांतील अत्यंत गोरगरीब जनताच वापरते. अन्य मध्यमवर्गीय रहिवाशांना निवासी इमारतींमध्ये सुरू असलेल्या दाटीवाटीच्या नर्सिंग होममध्ये किंवा महागड्या खासगी इस्पितळांत उपचार घ्यावे लागतात. दोन्ही शहरांमधील नर्सिंग होमचे फायर ऑडिट झाले आहे किंवा कसे याबाबत शंका व्यक्त होत आहे.
  केडीएमसीचे मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड म्हणाले की, महापालिकेच्या इस्पितळांना फायर ऑडिट करून घ्यावे लागते. रुग्णालयातील अग्निरोधक जुनी यंत्रणा बदलून नव्याने बसविण्यात आली आहे. केडीएमसी हद्दीतील दोन्ही इस्पितळे सध्या कोविडकरिता राखीव आहेत.

उल्हासनगरमध्ये  ‘फायर सेफ्टी’ अपुरी 
उल्हासनगर : शहरातील जिल्हास्तरीय मध्यवर्ती रुग्णालयातील फायर सेफ्टीची क्षमता कमी असल्याची नोटीस यापूर्वीच दिल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी बाळू नेटके यांनी दिली. आमदार कुमार आयलानी यांनी शनिवारी रुग्णालयाला भेट देऊन शिशू कक्षाची पाहणी केली.

उल्हासनगरातील जिल्हास्तरीय मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, मुरबाड, शहापूर, बदलापूर, अंबरनाथ, ग्रामीण परिसरातून शेकडो नागरिक उपचारासाठी येतात. दररोज १० पेक्षा जास्त बालके येथे जन्म घेत असून शिशू कक्षात १५ पेक्षा जास्त बालके राहत असल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हा चिकित्सक डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली. रुग्णालयाचे फायर सेफ्टी ऑडिट केल्याचे शिंदे यांनी सांगितले. मात्र अग्निशमन दलाचे प्रमुख नेटके यांनी रुग्णालयाची फायर सेफ्टी यंत्रणा कमी क्षमतेची असल्याने, यापूर्वीच नोटीस दिल्याचे स्पष्ट केले. कॅम्प नं. ४ येथील शासकीय प्रसूतिगृहाची फायर सेफ्टी यंत्रणाही कमी क्षमतेची असल्याने, त्यांनाही नोटीस देण्यात आली आहे तर कामगार रुग्णालयातील फायर सेफ्टी यंत्रणा कुचकामी असून त्यांनाही नोटीस दिल्याची माहिती नेटके यांनी दिली.

मीरा-भाईंदरमध्ये उद्या इस्पितळांची तपासणी
भाईंदर : येथील भीमसेन जोशी रुग्णालयाचे दरवर्षी फायर ऑडिट केले जाते. सोमवारपासून पुन्हा तपासणी केली जाणार असून मीरा रोड येथील इंदिरा गांधी रुग्णालयात प्रसूती होतात. हे ५० खाटांचे रुग्णालय असून दोन महिन्यांपूर्वी त्याची तपासणी केली होती. या रुग्णालयाचीही सोमवारपासून तपासणी केली जाणार असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश बोऱ्हाडे यांनी दिली.

केडीएमसीच्या रुग्णालयातून योग्य आरोग्य सेवा मिळत नसल्याची ओरड आहे. दोन्ही रुग्णालयांवर वर्षाला कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. तरीही योग्य प्रकारची आरोग्य सेवा मिळत नाही. ही बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे.
    -दीपक दुबे, पदाधिकारी, आप

ऑडिटची प्रक्रिया सुरू
भिवंडी : पालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयाच्या फायर ऑडिटचे काम अद्याप पूर्ण झाले नसून त्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॅा. राजेश मोरे यांनी दिली.

 

Web Title: Fires can occur in private nursing homes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे