ठामपाचे उत्पन्न २५९ कोटींनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 01:03 AM2020-03-15T01:03:29+5:302020-03-15T01:03:51+5:30

करवसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरासमोर बॅण्डबाजा वाजवण्यापासून त्यांच्या नळजोडण्या तोडण्यापर्यंत अनेक उपाययोजना महापालिकांनी केल्या आहेत. काही महापालिकांनी करदात्यांकरिता अभय योजना लागू केल्या आहेत. या आर्थिक चित्राचा सविस्तर घेतलेला आढावा...

The firm's income increased by 259 crore | ठामपाचे उत्पन्न २५९ कोटींनी वाढले

ठामपाचे उत्पन्न २५९ कोटींनी वाढले

Next

- अजित मांडके, ठाणे

ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिकांच्या क्षेत्रात सध्या मार्चअखेरपर्यंत करवसुलीची लगीनघाई सुरू आहे. उत्पन्नाचे लक्ष्य व प्रत्यक्षात वसुली यातील अंतर काही महापालिकांमध्ये बरेच मोठे आहे. त्याचा परिणाम विकासकामांवर झाला आहे. आगामी आर्थिक वर्षातील तरतुदींवरही या अल्प उत्पन्नाचा परिणाम होणार आहे. करवसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरासमोर बॅण्डबाजा वाजवण्यापासून त्यांच्या नळजोडण्या तोडण्यापर्यंत अनेक उपाययोजना महापालिकांनी केल्या आहेत. काही महापालिकांनी करदात्यांकरिता अभय योजना लागू केल्या आहेत. या आर्थिक चित्राचा सविस्तर घेतलेला आढावा...

ठाणे महापालिकेच्या विविध विभागांमार्फत आतापर्यंत करवसुलीचे २३०० कोटींचे उद्दिष्ट पार केले आहे. कररचनेत केलेले बदल, शहर विकास विभागाकडे मंजुरीसाठी आलेले नवीन प्रकल्प, विविध सवलतींच्या योजनांमुळे महापालिकेच्या विविध करांत समाधानकारक वाढ झाल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यानुसार, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा फेब्रुवारीअखेरपर्यंत पालिकेचे उत्पन्न हे २५९ कोटींनी अधिक असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत पालिकेला विविध करांतून २२९५ कोटी १७ लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. मागील वर्षी फेब्रुवारीअखेरपर्यंत २०३५ कोटी १८ लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले होते.
ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली करवसुलीसाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या होत्या. त्यानुसार, करवसुलीत वाढ होत आहे. ज्या करदात्यांनी अद्यापपर्यंत मालमत्ताकर भरलेला नाही, अशा करदात्यांविरुद्ध मालमत्ता अधिनियमातील तरतुदीनुसार प्रभागस्तरावर कडक कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच जे थकबाकीदार असतील, त्यांच्या मालमत्ता जप्त करणे, नळजोडण्या खंडित करणे, थकबाकीदारांची नावे फलकावर जाहीर करणे तसेच डिजी सिटीद्वारे आॅनलाइन पेमेंटची सुविधा पालिकेने करदात्यांना उपलब्ध करून दिली आहे. त्यावर कर भरल्यास त्यातही सूट दिली जात आहे. तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी पालिकेची करवसुली कार्यालये सुरू ठेवण्यात आलेली आहेत. याशिवाय, मालमत्ताकरात वाढ करण्यात आल्याने त्याचा परिणाम म्हणून मालमत्ताकराच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. शहर विकास विभागाकडे यंदाच्या आर्थिक वर्षात विविध विकास प्रस्तावांच्या संख्येत वाढ झाल्याने शहर विकास विभागाचेही उत्पन्न मागील वर्षीच्या तुलनेत वाढलेले आहे. पालिकेने आणलेल्या नव्या योजनेंतर्गत जे नागरिक देय असलेला थकीत मालमत्ताकर चालू मागणीसह १ फेब्रुवारी २०२० ते २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत एकरकमी भरतील, अशा करदात्यांना त्यांच्या मालमत्ताकरावरील दंड/व्याजाच्या रकमेमध्ये ५० टक्के सूट देण्यात येणार आहे. तसेच जे करदाते १ मार्च ते ३१ मार्च २०२० पर्यंत देय होणारा थकीत मालमत्ताकर चालू मागणीसह अधिक प्रशासकीय आकाराच्या ६० टक्के रक्कम एकरकमी भरतील, अशा करदात्यांना त्यांच्या मालमत्ताकरावरील दंड/व्याजाच्या रकमेत ४० टक्के सूट देण्यात येणार आहे. त्यामुळेदेखील पालिकेच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
ठाणे महापालिकेला या आर्थिक वर्षात ३७५० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार, फेब्रुवारीअखेरपर्यंत २२९५ कोटी १७ लाखांची वसुली करण्यात आली आहे. आता उर्वरित २० ते २५ दिवसांत मालमत्ताकर विभागाकडून १०० कोटी, शहर विकास विभाग १०० कोटी, शासनाकडून जीएसटी आणि अनुदानापोटी १२५ कोटी आणि इतर सुमारे ६० कोटींच्या आसपास असे ४५० कोटींच्या आसपास उत्पन्न येणे अपेक्षित आहे. त्यानुसार, उद्दिष्टाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही पालिकेचे म्हणणे आहे.

यंदा ३७५० कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असले तरी २७५० कोटींच्या आसपास उत्पन्न मिळेल, असा दावा पालिकेने केला आहे. असे झाल्यास उद्दिष्टापेक्षा १००० कोटींनी उत्पन्न कमी होईल, असेच दिसत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत उत्पन्न मात्र १५० ते २०० कोटींनी अधिक असेल, असेही पालिकेचे म्हणणे आहे.
 

Web Title: The firm's income increased by 259 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.