ठाणे जिल्ह्यात अवैध रेती उपशाविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत पहिली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 06:17 PM2017-09-08T18:17:04+5:302017-09-08T18:17:35+5:30
ठाणे जिल्ह्यातील अवैध रेती उपशाविरुद्ध जिल्हा प्रशासनाची सातत्याने कारवाई सुरू असतानाच आता डोंबिवली येथे वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंध घालणाऱ्या एमपीडीए कायद्यांतर्गत रेती व्यवसायातील एका प्रमुख व्यक्तीस स्थानबद्ध करण्यात जिल्हा प्रशासनास यश मिळाले आहे.
ठाणे दि ८ - ठाणे जिल्ह्यातील अवैध रेती उपशाविरुद्ध जिल्हा प्रशासनाची सातत्याने कारवाई सुरू असतानाच आता डोंबिवली येथे वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंध घालणाऱ्या एमपीडीए कायद्यांतर्गत रेती व्यवसायातील एका प्रमुख व्यक्तीस स्थानबद्ध करण्यात जिल्हा प्रशासनास यश मिळाले आहे. अशा स्वरूपाची ही पहिलीच कारवाई असल्याने भविष्यात या कारवायांना वेसन बसेल, अशी आशा आहे. पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी या बाबतीत अधिक कठोर कारवाई करण्यासंदर्भात पावले उचलण्याबाबत चर्चा केली होती.
शिवाजी प्रेरणा सोसायटी, कोपरगाव, डोंबिवली पश्चिम येथे राहणारा हनुमान राजाराम म्हात्रे ही 51 वर्षीय व्यक्ती या कायद्यात स्थानबद्ध करण्यात आली असून, त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. धोकादायक व्यक्ती या शीर्षकाखाली पोलिस सातत्याने सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करतात. महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस अॅक्टिव्हिटीज्-झोपडपट्टी दादा (एमपीडीए) कायद्यानुसार ही कारवाई केली जाते. वारंवार गंभीर गुन्हे करणाऱ्या व्यक्ती किंवा टोळ्यांना काबूत ठेवण्यासाठी पोलिसांना विशेष कायद्यांचा वापर करता येतो. या कायद्याच्या मदतीने पोलीस गुन्हेगारांच्या हालचाली नियंत्रित करू शकतात. शारीरिक इजा आणि मालमत्तेच्या गुन्ह्यांसंदर्भात ही कारवाई होऊ शकते. एखाद्या व्यक्तीवर एमपीडीएनुसार कारवाई झाली तर कोणत्याही सुनावणीविना त्यास एका वर्षासाठी जेलमध्ये बंद करता येते.
अवैध गौण खनिजांच्या संदर्भात उत्खनन व वाहतूक याविरुद्ध कल्याण, मोठा गाव, डोंबिवली खाडीमधून तसेच रेतीबंदर भागात गेल्या २ ते ३ वर्षांत ७२ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, असे कल्याण तहसीलदार यांनी कल्याण पोलीस उपयुक्त परिमंडळ ३ यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यापैकी २४ गुन्हे अज्ञात व्यक्तींविरुद्ध दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई व्हावी असा आग्रह प्रशासनाने धरला आहे.