पहिलीच महासभा पाण्याने गाजणार
By admin | Published: April 17, 2017 04:48 AM2017-04-17T04:48:27+5:302017-04-17T04:48:27+5:30
शहरातील तीव्र पाणीटंचाईवर शिवसेना आक्रमक झाली आहे. पहिल्याच महासभेत पाणीप्रश्नावर सत्ताधाऱ्यांसह पालिका प्रशासनाची कोंडी
उल्हासनगर : शहरातील तीव्र पाणीटंचाईवर शिवसेना आक्रमक झाली आहे. पहिल्याच महासभेत पाणीप्रश्नावर सत्ताधाऱ्यांसह पालिका प्रशासनाची कोंडी करण्याची पूर्ण तयारी केली आहे. नागरिकांना आठवड्यातून दोन ते तीन दिवसच पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, कबरस्तान, रिजन्सी रेसिडन्सीजवळील भूखंड, व्हीटीसी मैदान, डम्पिंग, रस्ते आदी प्रश्नांची प्रश्नावली शिवसेनेने केली आहे.
उल्हासनगरातील पाणीटंचाईच्या निषेधार्थ शिवसेना नगरसेवकांनी गेल्या आठवड्यात जिजामाता गार्डनसमोर उपोषण केले होते. आयुक्त सुधाकर शिंदे व महापौर मीना आयलानी यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले होते. मात्र, पाणीपुरवठ्यात काहीही फरक पडला नसल्याची माहिती नगरसेवक अरुण अशान यांनी दिली. २० एप्रिलला महासभा होत असून पाणीप्रश्न महासभेत गाजणार, अशी माहिती शिवसेनाशहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. विरोधी पक्षाची भूमिका काय असते, ते सत्ताधाऱ्यांना दाखवून देणार असल्याचे ते म्हणाले.
कॅम्प नं.-४ व ५ परिसरांतील मराठा सेक्शन, जिजामाता गार्डन, ओटी सेक्शन, भीमनगर, मद्रासीपाड्यासह सुभाष टेकडी, संभाजी चौक, सत्यसाई शाळा परिसर, गायकवाडपाडा, कैलास कॉलनी, समतानगर, तानाजीनगर, महादेवनगर, लालचक्की परिसरात पाणीटंचाई सर्वाधिक आहे.
आयुक्तांच्या म्हणण्यानुसार दरदिवशी १२९ दशलक्ष लीटरपाणीपुरवठा एमआयडीसीकडून होतो. लोकसंख्येच्या दुप्पट पाणीपुरवठा होऊनही शहरात टंचाई निर्माण झाली. यामागे फसलेली ३०० कोटींची पाणीपुरवठा योजना असून ४० टक्कयांपेक्षा जास्त गळतीचे प्रमाण असल्याचे ते म्हणाले. शहरातील जलवाहिन्या अनेक ठिकाणी फुटल्या असून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. पालिका यावर ठोस कारवाई व उपाययोजना करीत नसल्याची माहिती शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. तर, टप्प्याटप्प्याने जलवाहिन्यांचे सर्वेक्षण करणार असल्याची माहिती आयुक्त शिंदे यांनी दिली. (प्रतिनिधी)