शिवसेना भवनावरील पहिला हल्ला; अंधाराचा फायदा घेत बराच वेळ दगड अन् चपालांचा मारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 06:43 PM2022-05-02T18:43:13+5:302022-05-02T18:43:30+5:30
देशभर काँग्रेसविरोधी वातावरण होते. आणीबाणीला शिवसेनेने पाठिंबा दिला होता. त्यामुळे मुंबईतील अनेकांचा शिवसेनेवर राग होता.
- संजीव साबडे
स्व. इंदिरा गांधी यांची राजवट आणि आणीबाणी याविरोधात तेव्हाचे समाजवादी पक्ष, जनसंघ, राष्ट्रीय लोकदल, जुनी म्हणजे सिंडिकेट काँग्रेस हे सारे पक्ष लढत होते. लोकांनायक जयप्रकाश नारायण (जेपी) यांनी एकत्र आणले. त्यातून सर्वांची मोट बांधून जनता पक्षाची 1977 साली स्थापना झाली. त्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला पराभूत केले. जनता पक्षाच्या हाती सत्ता दिली. स्वतः इंदिरा गांधी व पुत्र संजय यांचाही पराभव झाला. मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. देशात बिगर काँग्रेसी पक्ष प्रथमच सत्तेवर आला. देशभर काँग्रेसविरोधी वातावरण होते. आणीबाणीला शिवसेनेने पाठिंबा दिला होता. त्यामुळे मुंबईतील अनेकांचा शिवसेनेवर राग होता.
विजयानंतर शिवाजी पार्कवर जनता पक्षाची विशाल सभा झाली. त्या सभेत लोक शिवसेनेच्या विरोधात घोषणा देत होते. शिवसेना भवन तर तिथून दोन मिनिटांवर. सभेनंतर जनता पक्षाचे (म्हणजे समाजवादी पक्ष व जनसंघ. मुंबईत लोकदल व जुन्या काँग्रेसचे फारसे अस्तित्वाचं नव्हते.) कार्यकर्ते दादर स्टेशनकडे निघाले. शिवसेनाविरोधी घोषणांचा प्रभाव होता. त्यामुळे कार्यकर्त्यांनी शिवसेना भवन दिसताच त्यावर आधी चपला फेकल्या. मग काहींनी दगडफेक सुरू केली. वेळ रात्रीची होती. सभेमुळे वाहतूक अन्य मार्गाने वळवली होती. केवळ सभेला आलेल्या लोकांचीच रस्त्यांवर गर्दी होती.
आतापर्यंत शिवसेना भवनावर असा हल्ला करण्याची, चपला, दगड फेकण्याची कोणाची हिंमत झाली नव्हती. अंधाराचा फायदा घेऊन बराच वेळ दगड व चपालांचा मारा सुरू राहिला. आपल्याला कोणी विरोध करीत नाही, कोणाची आपला सामना करायची हिंमत नाही, असं जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना वाटू लागलं. त्यामुळे ते अधिकच चेकाळले. शिवसेना नेत्यांच्या विरोधात ते घोषणा देऊ लागले.
शिवाजी पार्क, दादर हा तेव्हाही शिवसेनेचा बालेकिल्ला होता. पण जनता पार्टी कार्यकर्त्यांच्या एवढ्या मोठ्या मॉबसमोर यायला शिवसैनिकही बहुदा कचरत असावेत. शिवसेना भवन पूर्णत: बांधूनही झाले नव्हते, तरीही त्या दिवशी आत सुमारे १५० शिवसैनिक होते. सेना भवनाच्या गृहशांतीच्या तयारीसाठी ते तिथे आल्याचे स्पष्टीकरण स्वत: शिवसेनाप्रमुखांनीच नंतर दिलं.
थोड्याच वेळात जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवरही कुठून तरी चपला फेकल्या जाऊ लागल्या, पाठोपाठ दगड येऊ लागले. हे सारे इमारतीतून येत होते. शिवाय प्लाझा सिनेमा आणि कोहिनूर मिल येथूनही दगड, बाटल्या येऊ लागल्या. यामुळे अशा हल्ल्याची, मारामाऱ्यांची सवय नसलेले आणि प्रथमच ताकद दाखवू पाहणारे जनसंघ व समाजवादी लोक भेदरून गेले. ते वाटेल तसे धावत सुटले. आसपासच्या गल्ल्या शिरले, तिथेही काहींना मार खावा लागला.
थोड्या वेळात पोलीस आले. त्यांनी सर्वांना पांगवायला सुरुवात केली. त्यांच्याही लाठ्या पडू लागल्या. पण त्यामुळे अर्ध्या तासात रस्ते रिकामे झाले. त्या रस्त्यांवर अनेकांच्या चपला व बरेच दगड पडले होते. पण दोन्ही बाजूंनी हे प्रकरण वाढू दिले नाही. त्यामुळे केंद्रात सत्तेवर आलेल्या जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उन्माद आणि पराभूत शिवसेनेचा खुन्नस तिथल्या तिथेच संपला. शिवसेना भवनावर झालेला तो पहिला आणि अर्थातच शेवटचा हल्ला. तब्बल 45 वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेची छायाचित्रं तर सोडाच, पण माहितीही इंटरनेटवर उपलब्ध नाही. तेव्हाचे शिवसैनिक व काही जनता पार्टी कार्यकर्ते यांनाच ही घटना कदाचित आठवत असेल.