मीरा रोडच्या शीतलनगरमध्ये पहिले फुलपाखरू उद्यान साकारणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 12:00 PM2018-07-04T12:00:38+5:302018-07-04T12:01:01+5:30
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे आकर्षण असलेले फुलपाखरू उद्यान मीरा रोड शीतलनगर येथे आकारास येत आहे.
मीरा रोड - लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे आकर्षण असलेले फुलपाखरू उद्यान मीरा रोड शीतलनगर येथे आकारास येत आहे. स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींच्या हस्ते फुलपाखरांना पोषक झाडांचे रोपण करण्यात आले आहे. शीतलनगर येथील आरजी जागेतील दादा शीतल नाथ उद्यान हे आता फुलपाखरू उद्यान ठरणार आहे. स्थानिक नगरसेवक राजीव मेहरा यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या या पार्कसाठी पर्यावरणप्रेमी सचिन राणे, दीपेन शाह, अभिजित कुमार यांची मोलाची साथ मिळत आहे. फुलपाखरांना उपयुक्त अशी २००च्या वर झाडांची लागवड या ठिकाणी होणार आहे.
परिसरातील रहिवाशांसह नगरसेवक राजीव मेहरा, अनिल सावंत, रुबिना फिरोज, मार्लिन डिसा, अशरफ शेख, माजी नगरसेवक प्रमोद सामंत, एस. ए. खान आदींच्या हस्ते झाडांच्या लागवडीस सुरुवात करण्यात आली. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याची जोपासना केली जाणार असून, त्याचा व लागवड आदींचा खर्च मेहरा करणार आहेत. हे उद्यान पूर्ण झाल्यानंतर अशा प्रकारची आणखी उद्याने पालिकेच्या माध्यमातून उभारण्याचा मानस मेहरा, सावंत यांनी व्यक्त केला.