काशिगाव पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 00:42 IST2024-03-17T00:42:17+5:302024-03-17T00:42:41+5:30
दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी एका कुटुंबावर हल्ला केल्याची घटना आहे .

काशिगाव पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल
मीरारोड - १४ मार्च पासून नव्याने सुरू झालेल्या काशिगाव पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा १५ मार्च च्या मध्यरात्री दाखल झाला आहे . दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी एका कुटुंबावर हल्ला केल्याची घटना आहे .
भाईंदर पूर्वेच्या न्यू गोल्डन नेस्ट येथील जानकी हाइट्स मध्ये राहणारे गणेश हांडगर हे त्यांची आई व लहान मुलास घेऊन १४ मार्च रोजी गाडीने तुंगारेश्वर येथे दर्शनासाठी चालले होते. सायंकाळी ४ च्या सुमारास मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील पाली विलेज हॉटेलच्या पुढे मागून गाडीतून आलेल्या मुस्कान उर्फ बेबी तिचा मित्र सलमान व फैजान यांनी हंडगर यांची गाडी अडवली . हंडगर व त्यांच्या आईने दाखल केलेले दोन गुन्हे मागे घेण्यास धमकावत दमदाटी व शिवीगाळ करत रॉड ने गाडीच्या काचा फोडून टाकल्या . तर सलमान याने बंदुकी सारखे दिसणारे हत्यार दाखवून हंडगर यांना जीवे मारण्यास धमकावले. वर्दळीच्या महामार्गवर हि घटना घडल्याने अन्य गाड्या थांबल्या तसेच परिसरात काम करणारे सुद्धा जमल्याने हल्लेखोर पळून गेले असे हंडगर यांनी म्हटले आहे .
त्यांच्या फिर्यादीवरून काशिगाव पोलिसांनी मुस्कान , सलमान व फैजान वर गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजीत लांडे हे तपास करत आहेत. मुस्कान ही हंडगर यांची दुसरी पत्नी असून ती तिचा प्रियकर मित्र सलमान सह घरातील दागिने व रोग घेऊन पळून गेल्याबद्दल हंडगर यांनी तर मुस्कान हिने देखील हंडगर विरुद्ध नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.