ठाण्यात रंगणार पहिले सीकेपी साहित्य संमेलन, संमेलनाचे अध्यक्ष प्रविण दवणे तर स्वागताध्यक्ष मोहन गुप्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 04:20 PM2017-12-19T16:20:54+5:302017-12-19T16:31:58+5:30
ठाण्यात २०१८ मध्ये पहिलेच सीकेपी साहित्य संमेलन रंगणार आहे. एक दिवसीय संमेलनात परिसंवाद, काव्यसंमेलन, पत्रकारांची मुलाखत, मनोरंजन, पुस्तक प्रदर्शन आदी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
ठाणे: अखिल भारतीय सीकेपी मध्यवर्ती संस्था आणि सीकेपी ज्ञातीगृह ट्र्स्ट, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार १० फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी ९ ते सायं. ७ वा. सीकेपी हॉल, ठाणे येथे पहिले सीकेपी साहित्य संमेलन, २०१८ होत आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद प्रविण दवणे व स्वागताध्यक्षपद माजी महापौर मोहन गुप्ते भूषविणार आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुधाकर वैद्य यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
या संमेलनात परिसंवाद, काव्यसंमेलन, पत्रकारांची मुलाखत, मनोरंजन, पुस्तक प्रदर्शन आदी कार्यक्रमांचा समावेश असून उपस्थितांसाठी खास कायस्थ पद्धतीचा अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. संमेलनाच्या निमित्ताने काव्यलेखन व निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. ही निबंध स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खुली स्पर्धा व फक्त ज्ञातीबंधु - भगिनींसाठी अशा दोन गटांत घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी ‘कै. राम गणेश गडकरी यांचे वाड्.मय’, ‘आरक्षण माझे मत’ व आजच्या तरुण पिढीचे स्वप्न व आकांक्षा हे तीन विषय देण्यात आले आहे. यावेळी संमेलनात ‘कायस्थ युगंधर’ हा अंक प्रकाशित होणार आहे. चांद्रसेनीय कायस्थ प्रभु ज्ञातितील साहित्य पुरस्कार प्राप्त कथा, लघुकथा, कादंबरी, नाट्य, प्रवासवर्णन, काव्य समिक्षा इत्यागी कोणत्याही प्रकारचे साहित्य पुस्तक रुपाने प्ररकाशित झालेले पुस्तक हे प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे. साहित्यिकांनी आपली वैयक्तीक माहिती लिखित स्वरुपात १० जानेवारी २०१८ पर्यंत पाठवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे. काव्य संमेलनात सहभागी होण्यास उत्सुक असणाºयांनी आपल्या दोन कविता आयोजकांकडे १० जानेवारी २०१८ पर्यंत पाठविण्याचे देखील आवाहन केले आहे.
चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाचे भूषण भाषा प्रभु कै. राम गणेश गडकरी शतकमहोत्सवी स्मृतीवषार्निमित्त २३ जानेवारी २०१८ ते २३ जानेवारी २०१९ या कालावधीत अखिल भारतीय सीकेपी मध्यवर्ती संस्थेतर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचा शुभारंभ २३ जानेवारी रोजी कर्जत येथील ‘जीवन शिक्षण मंदिर’, ज्या शाळेत गडकरी यांनी मराठी भाषेचे प्राथमिक शिक्षण घेतले, त्याच शाळेतील कार्यक्रमाने हौईल. त्याचदिवशी सायंकाळी सातारा येथेही ेक कार्यक्रम आयोजित केला आहे.