अंबरनाथ शहरातील पहिला काँक्रिटचा रस्ता ठरताेय डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:24 AM2021-07-12T04:24:58+5:302021-07-12T04:24:58+5:30
शहरातील पहिला काँक्रिट रस्ता एमएमआरडीएच्या निधीतून उभारला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्वामी समर्थ चौकापर्यंत या रस्त्याची मंजुरी ...
शहरातील पहिला काँक्रिट रस्ता एमएमआरडीएच्या निधीतून उभारला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्वामी समर्थ चौकापर्यंत या रस्त्याची मंजुरी देण्यात आली होती. या रस्त्याचे काम स्वामी समर्थ चौकातून करण्यात आले होते. अत्यंत रखडलेल्या अवस्थेत हे काम पूर्ण करण्यात आले. आज हा रस्ता वाहनचालकांसाठी आणि नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. या रस्त्याच्या मध्यभागी विजेचे खांब टाकण्यासाठी आरसीसी बिम तयार केले होते. मात्र, हे खांब न बसवल्याने त्यासाठी करण्यात आलेल्या अर्धवट बांधकामातील लाेखंडी शिगा बाहेर आल्या आहेत. त्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. रस्त्याच्या मध्यभागी हे धोकादायक बिम असून ते न काढले गेल्याने वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नाही. त्यातच या बिममधील बाहेर पडलेले लोखंड अनेक वाहनांचे टायर फोडण्यास कारणीभूत ठरले आहे. एवढेच नव्हे तर अनेक दुचाकीस्वारही त्यावर आदळल्याच्या घटना घडल्या आहेत. नियमित व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या संपूर्ण रस्त्याची पुरती दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची नव्याने दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
----------
फोटो