राज्यातील पहिला ई मोजणी ऑनलाईन नोंदणी अर्ज भिवंडीतून दाखल
By नितीन पंडित | Published: August 3, 2022 07:03 PM2022-08-03T19:03:26+5:302022-08-03T19:04:02+5:30
महाराष्ट्रातील जमीन महसुल दस्त हे ब्रिटिश कालीन व्यवस्थेमुळे आज वर जोपासले जात असताना अनेक दस्त जीर्ण खराब झाल्याने अनेक गाव महसूल संदर्भातील नोंदी मिळू शकत नाहीत.
नितिन पंडीत
भिवंडी :
महाराष्ट्रातील जमीन महसुल दस्त हे ब्रिटिश कालीन व्यवस्थेमुळे आज वर जोपासले जात असताना अनेक दस्त जीर्ण खराब झाल्याने अनेक गाव महसूल संदर्भातील नोंदी मिळू शकत नाहीत. त्यामुळे अनेकांचा हिरमोड होत असताना शासन स्तरावर नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून जमीन महसूल दस्त अद्यावत करण्याचा प्रयत्न सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून १७ जुलै पासून महाराष्ट्रात प्रथमच ऑनलाईन इ मोजणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यामध्ये प्रथम ई मोजणी अर्ज भिवंडी भूमी अभिलेख कार्यालयातून दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात ई मोजणी ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्या पूर्वी प्रयोगिक स्तरावर राज्यातील सहा तालुक्यांची निवड करण्यात आली होती त्यामध्ये भिवंडीचा समावेश होता. नागरीकांची आज्ञावली ई मोजणी ऑनलाईन करण्यास सुरुवात केली असता तालुक्यातील मौजे चावे गावातील जमीन धारकाने आपल्या जमीन मोजणीसाठी ई अर्ज दाखल केला असल्याची माहिती भिवंडी भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक प्रमोद जरग यांनी दिली आहे.
जमीन मोजणी साठी अर्ज करणे, त्यांनतर बँकेत त्यासाठी फी जमा करा, व त्यानंतर कार्यालयात हेलपाटे घाला या सर्व गोष्टींना फाटा देत जमीन मोजणी कामात पारदर्शकता आणली जाणार असून त्यासाठी जमीन मालकास थेट मोबाईल द्वारे आपल्या जमिनीच्या मोजणी संदर्भात ई अर्ज करता येणार असून बँकेत न जाता मोबाईल द्वारे पैसे भरणा करता येणार असल्याने मोजणीसाठी लागणार अतिरिक्त कालावधी टाळून विहित मुदतीत जमीन मोजणी शक्य होणार आहे. त्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. तर राज्याचे पुणे येथील जमाबंदी आयुक्त यांनी भिवंडी भूमिअभिलेख कार्यालयाचे अभिनंदन केले आहे.