१९९५ च्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेला यश
By Admin | Published: October 10, 2015 12:07 AM2015-10-10T00:07:15+5:302015-10-10T00:07:15+5:30
केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असतानाही केडीएमसीच्या पहिल्याच १९९५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा एकमेकांसमोर उभे ठाकले होते. शिवसेना-भाजपा-काँग्रेस
- प्रशांत माने, कल्याण
केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असतानाही केडीएमसीच्या पहिल्याच १९९५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा एकमेकांसमोर उभे ठाकले होते. शिवसेना-भाजपा-काँग्रेस अशा तिरंगी झालेल्या लढतीत शिवसेनेने घवघवीत यश संपादन केले, तर भाजपाला विरोधी पक्षात बसावे लागले. कल्याण-डोंबिवली हा बालेकिल्ला कोणाचा, हे ठरविणारी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती.
केंद्रात, राज्यात सत्ता असल्याने केडीएमसीच्या निवडणुकीत युती होईल, अशी शक्यता होती. महापालिकेचे एकूण ९६ प्रभाग होते. दरम्यान, त्या वेळीही २७ गावांतील संघर्ष समितीने निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने ८६ प्रभागांमध्ये निवडणुका झाल्या. या ८६ जागांच्या वाटपावर चर्चा सुरू झाल्या खऱ्या, परंतु वाटपाचे सूत्र ठरत नव्हते.
शिवसेनेला घवघवीत यश
निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या सेना-भाजपाकडून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. दोन्ही पक्षांतील भांडणाचा फायदा काँग्रेस उठवेल, अशी अपेक्षा होती. परंतु, ती कालांतराने फोल ठरली. शिवसेनाविरुद्ध भाजपाविरुद्ध काँग्रेस अशा तिरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
या निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री मनोहर जोशी, भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तर भाजपाच्या वतीने उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन आदी दिग्गज नेते उतरले होते. दरम्यान, निवडणुकीच्या निकालात ८६ पैकी ४० जागा जिंकून शिवसेना सत्तेच्या जवळपास पोहोचली.
बहुमतासाठी त्यांना ५ जणांच्या पाठिंब्याची आवश्यकता होती. सर्व ६ अपक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. यात शिवसेनेने सत्ता काबीज केली तर बालेकिल्ला असल्याच्या भ्रमात असलेल्या भाजपाचा मात्र चांगलाच भ्रमनिरास झाला. त्यांना २३ जागांवर तर काँग्रेसला १७ जागांवर विजय मिळविता आला. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या भाजपाला विरोधी पक्ष म्हणून समाधान मानावे लागले.
५० टकके जागांचा होता आग्रह
आधीच्या कल्याण-डोंबिवली नगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता होती. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत अधिक जागा हव्यात, असा दावा त्यांनी केला होता. शिवसेनेला २५ च्या आसपास जागा सोडण्यास भाजपा तयार झाली होती. परंतु, हे शिवसेनेला मान्य नव्हते. त्यांनी ५० टकके जागांचा आग्रह धरला होता. अखेर, जागावाटपावरून बोलणी फिस्कटल्याने युती होऊ शकली नाही.