डोंबिवलीतील पहिला गणेशोत्सव @ ९५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 12:46 AM2019-09-08T00:46:00+5:302019-09-08T00:46:14+5:30
माझ्या आठवणीतील गणेश उत्सवामध्ये विविध स्पर्धा व मनोरंजनाचे कार्यक्रम होत असत. मंदिराच्या सभागृहात एका स्टॅन्डवर एक पांढरी चादर घट्ट ताणून बांधून प्रोजेक्टरच्या सहाय्याने रिळामध्ये बंदिस्त असलेला ‘छत्रपती शिवाजी’ हा सिनेमा दाखवला होता.
मोहन दातार
तिन्हीसांजेला गुरावासरांसह आणि घरट्याकडे परतणाऱ्या पक्षी-पाखरांबरोबरच गांवकरी आपल्या घरात परतत असत. संध्याकाळी सात, साडेसातच्या आसपास डोंबिवली हे गाव शांत होत असे. नोकरदार माणसांना आणण्यासाठी कंदील घेऊन रेल्वे स्टेशनवर जाणारी तुरळक माणसे दिसत असत. मिणमिणत्या प्रकाशात (संख्येने कमी असणारी) दुकाने बंद करण्याची लगबग सुरू असे. गांवात तुरळक ठिकाणी वीज होती. मला आठवणीत असलेल्या काळात म्हणजे १९५० च्या आसपास आत्ताचा आप्पा दातार चौक, पेंडसे नगरच्या कोपºयावर बाजी प्रभू चौकातील सध्याच्या महावितरणच्या जागी असे तीन चार ठिकाणी लाकडी खांबावर बसवलेले काचेची षटकोनी हंडी असलेले रॉकेलचे दिवे रस्त्याच्या बाजूला लागत असत. ते काम गणपत नावाच्या व्यक्तीकडे होते. गावकऱ्यांना काही विशेष सूचना देण्यासाठी गावात दवंडी पिटण्याचे कामही त्याच्याकडे असे. घरोघरी गणपतीची प्रतिष्ठापना होत असे. संध्याकाळी घराघरातील झांजांच्या किणकिणीसह आरत्या आणि मंत्रपुष्पांजलीने कातरवेळ प्रसन्न वाटत असे. बहुदा बºयाच जणांचे गणपती दीड दिवसांचे असत. गणेश मंदिर परिसरातील दातार, भागवत, कर्वे, गोरे, कानिटकर, दामले, आपटे, इत्यादींचे गणपती विसर्जनासाठी एकत्रित पंचायत विहिरीवर जात असत. सर्वांतर्फे एकत्रित आरती होऊन हार, फुले, निर्माल्य, बाजूला काढून फक्त शिदोरी (नैवेद्य) सह गणरायाचे विसर्जन होत असे. पंचायत विहीर तेव्हा बारमाही जिवंत झरे असलेली होती. अनेक पिढ्या या विहिरीत पोहायला शिकल्या. पावसाळ्यात पाण्याने काठोकाठ भरलेली पंचायत विहीर पाहण्याचे भाग्य मला लाभले.
लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय, सामाजिक प्रबोधन आणि संघटन या उद्देशाने सुरू केलेल्या ‘सार्वजनिक गणपती’ च्या उपक्रमापासून स्फूर्ती घेऊन फडके रोडवरील कर्वे वाडीच्या मोकळ््या जागेत १९२६ साली डोंबिवलीतील पहिला ‘सार्वजनिक गणेशोत्सव’सुरू झाला. श्री. कृ. भागवत, ग. शं. पटवर्धन, पं. ल. वैद्य (त्यांना लोणीवाले वैद्य म्हणत असत.) ल. रा. वडतबाळकर, ना. चिं. भागवत, त्र्यं. रा. गाडगीळ, कृष्णाजी जोशी आदींनी त्यात पुढाकार घेतला. यातील बºयाचशा व्यक्ती पाहण्याचे भाग्य मला लाभले. सदर जागेवर घरे बांधण्याच्या योजनेमुळे गणेशोत्सव मंडळाने विनंती केल्यावरून गणेश मंदिराच्या तत्कालीन विश्वस्तांच्या परवानगीने सन १९२८ पासून उत्सव गणेश मंदिराच्या सभागृहात होऊ लागला. उत्सवासाठी कार्यकारी मंडळाची निवडणूक झाली त्यात कै. शंकर वामन दातार हे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. दरवर्षी मंडळाने उत्सवासाठी लेखी परवानगी मागण्याची प्रथा आजपर्यंत सुरू आहे. मंडळातील काही व्यक्ती वारकरी संप्रदायाच्या असल्याने गणेश विसर्जन एकादशीला करण्याची प्रथा पडली असावी, असे वाटते.
माझ्या आठवणीतील गणेश उत्सवामध्ये विविध स्पर्धा व मनोरंजनाचे कार्यक्रम होत असत. मंदिराच्या सभागृहात एका स्टॅन्डवर एक पांढरी चादर घट्ट ताणून बांधून प्रोजेक्टरच्या सहाय्याने रिळामध्ये बंदिस्त असलेला ‘छत्रपती शिवाजी’ हा सिनेमा दाखवला होता.(त्या काळी गावात थिएटर नव्हते)खूप गर्दीमुळे आम्ही काही मुले स्क्रीनच्या मागे जागा पटकावून बसलो होते. सगळे सैनिक आणि मावळे डाव्या हाताने तलवार चालवताना दिसत होते. मध्येच फिल्म तुटत असे, ती जोडून परत सिनेमा सुरू होत असे. त्या अंधारातही कुठलीही हुल्लडबाजी, शिट्या मारणे, असे प्रकार होत नसत. सतत वर पडद्याकडे बघून मानेला रग लागत असे. तरीही आमच्या आनंदात कुठलीही कमतरता वाटत नसे. अडचणी, अभाव आणि गैरसोय यामध्येही आनंद शोधण्याचा स्वभाव त्या पिढीचा असल्याने कदाचित ते शक्य होत असेल. १९६४ च्या सुमारास तत्कालीन उत्सव मंडळाच्या कै. रामभाऊ दातार, दाजी दातार, कै.आप्पा दातार, बच्चा निमकर, दिवाकर पटवर्धन, बंडू कानिटकर अशा कार्यकर्त्यांनी वडाच्या पारासमोर पत्र्यांचा पक्का मांडव बांधून दिला होता. पक्क्या मांडवामुळे बरेच कार्यक्रम मंदिराबाहेर होऊ लागले.
मंडळाच्या गणेशोत्सवात पं. भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, छोटा गंधर्व आदी अनेक सुप्रसिद्ध गायकांच्या संगीत मैफिली, पु. भा. भावे, शिवाजीराव भोसले, बाळशास्त्री हरदास आदींची स्फूर्तीप्रद भाषणे, प्रवचने तसेच राष्ट्रीय किर्तनकार कै. गोविंदस्वामी आफळे यांची किर्तने, तसेच शं. ना. नवरे, व. पु. काळे यांचे कथाकथन असे दर्जेदार कार्यक्रम संपन्न झाले आहेत. त्या काळी साध्या पण आकर्षक मखर सजावटीमुळे गणेश दर्शनाने मनाला प्रसन्नता वाटायची. आरास आणि भव्य सजावटीऐवजी प्रबोधन आणि दर्जेदार मनोरंजनात्मक कार्यक्रमांवर जास्त खर्च होत असे. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत मंडळाच्या कार्यकर्त्यां बरोबरच गावातील नागरिकही मोठ्या संख्येनी सहभागी होत असत.
गणपतीची पालखी मिरवणुकीने फडके रोड, भाजी मार्केट वरून नेहरू रोडने गणेश मंदिरात येत असे. मिरवणुकीच्या मार्गावर घराघरातून सुवासिनी निरांजनांसह गणेश मूर्तीला भक्तिभावाने ओवाळीत असत. मिरवणुकीत लेझीम, टाळ आदींच्या तालावर ‘मोरया’... ‘मोरया’ च्या गजरात सुमारे तीन तास कसे निघून जात ते कळत नसे. दंडयुद्ध, खड्ग, तलवारीचे हात व वेत्रचर्म, असे मैदानी खेळही अनेक वर्षे होत असत. या सर्व खेळांमध्ये माझ्यासह अनेक तरूण उत्साहाने भाग घेत होते. हातावरील वेताचे वळ आणि खांद्यावर आणि पाठीवरील दंडाचे मार दुसºया दिवशी जाणवत असत, सर्व अंग खूप दुखत असे.
उत्सवाच्या संस्थापक कार्यकर्त्यां बरोबरच दाजी दातार, कै.आप्पा दातार, कै.बंडोपंत कानिटकर, आबा पटवारी, हरीष कांत, कै.रामभाऊ कापसे, कै. मदन ठाकरे, कै. रमेश ठाकरे, मनोहर सडेकर, अण्णा सुळे, कै. बाबुराव गुरव, कै. माधवराव कदम, आदी प्रख्यात व्यक्ती मंडळाचे कार्यकर्ते या नात्याने डोंबिवलीतील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मांडवा खालूनच गेल्या आहेत. आता एकंदरीत आर्थिक सुबत्तेसह सभोवताली झालेले सामाजिक बदल, बदललेल्या वृत्ती आणि प्रवृती, बदलत्या अभिरुची अशा प्रतिकूल वातावरणातही राष्ट्रीय, सामाजिक प्रबोधन आणि मनोरंजनाचा दर्जा टिकवून उत्सव मंडळाची प्रतिष्ठा राखण्याचे अटोकाट प्रयत्न सध्याचे मंडळाचे कार्यकर्ते करीत आहेत. त्यासाठी डोंबिवलीतील पहिले गणेशोत्सव मंडळ आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा.
(लेखक हे १९६२ ते १९७२ दरम्यानच्या काळातले या मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते होते)