ठाण्यात प्रथमच "गृहनिर्माण संस्थाचे महाअधिवेशन"; ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग
By अजित मांडके | Published: May 22, 2024 04:37 PM2024-05-22T16:37:06+5:302024-05-22T16:47:40+5:30
ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ०७ ते ०९ जून या कालावधीत महाअधिवेशन व प्रदर्शन
ठाणे : गृहनिर्माण संस्थांच्या पुर्नविकासात विविध समस्या व अडचणीबाबत चर्चा तसेच, मार्गदर्शन करण्यासाठी ०७ जून ते ०९ जुन या कालावधीत ठाण्यातील कोकणी पाडा, उपवन तलाव येथील मैदानात भव्य वातानुकुलीत मंडपात "गृहनिर्माण संस्थाचे महाअधिवेशन" व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार ०७ जून रोजी उदघाटन सोहळा, शनिवार ०८ जून रोजी महाअधिवेशन आणि ०९ जून रोजी प्रदर्शन व सायंकाळी समारोप होईल अशी माहिती ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी दिली.
ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने होणारे हे ठाणे जिल्हयातील पहिलेच महाअधिवेशन असुन सुमारे आठ ते १० हजार सहकारी गृहनिर्माण संस्थाचे प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी सुविधा उपलब्ध असुन यावेळी गृहनिर्माण सोसायट्यांकरीता लागणारे किट दिले जाणार आहे असेही ते म्हणाले.
या अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे,गटनेते प्रविण दरेकर, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, सहकार आयुक्त आदीसह अनेक मान्यवर उपस्थित राहतील. या अधिवेशनात गृहनिर्माण संस्थांचा पुर्नविकास, त्याचबरोबर त्याचबरोबर वेगवेगळ्या कारणांनी रखडलेले पुर्नविकास प्रकल्प, स्वयंपुर्ण विकासाच्या समस्या व स्वयंपूर्ण विकासासाठी अर्थसाह्य, वारंवार खोट्या तक्रारी करणाऱ्या विरुद्ध कारवाईची मागणी, गृहनिर्माण संस्थांच्या सहकार कायद्याबाबत सुधारणा तसेच, आवश्यक ते बदल या बरोबरच गृहनिर्माण संस्थांच्या वेगवेगळ्या समस्या तसेच अडचणी आदी विषयांवर मार्गदर्शन करून त्या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा देखील केला जाणार आहे. तसेच,या अधिवेशनात यासंदर्भातील वेगवेगळे ठराव देखील पारित केले जाणार आहेत.