पहिला हातोडा किसननगरवर

By Admin | Published: December 4, 2015 12:34 AM2015-12-04T00:34:46+5:302015-12-04T00:34:46+5:30

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ठाणे महापालिकेने हाती घेतलेल्या कामात पुनर्विकासाचा पहिला हातोडा विकासाला मोठी संधी असलेल्या किसननगर परिसरावर पडणार आहे.

First Hatha Kissanagar | पहिला हातोडा किसननगरवर

पहिला हातोडा किसननगरवर

googlenewsNext

- अजित मांडके,  ठाणे

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ठाणे महापालिकेने हाती घेतलेल्या कामात पुनर्विकासाचा पहिला हातोडा विकासाला मोठी संधी असलेल्या किसननगर परिसरावर पडणार आहे.
स्मार्ट सिटीसाठी निवडलेल्या भागातील ३० वर्षे जुन्या इमारतींपैकी ज्या इमारती स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये नापास ठरतील, त्या तोडल्या जाणार आहेत. ठाणे शहराचा अत्यंत महत्वाचा भाग असलेल्या ७५० एकर परिसराचा पुनर्विकास स्मार्ट सिटीअंतर्गत होणार आहे. यात क्लस्टर डेव्हलपमेंटसह पुनर्विकासाचा आधार घेत जुन्या ठाण्याचे नव्या ठाण्यात रूपांतर केले जाणार आहे. केवळ ठाणे स्टेशनचा परिसरच नव्हे तर शहरातील अतिशय गजबजलेल्या, गर्दी व जुन्या इमारतींची ओळख असलेल्या किसननगरच्या ७० एकर परिसराचेही रूपडे पालटणार आहे. तसेच तीनहात नाका, वंदना सिनेमा, मनोरुग्णालय परिसर, मीनाताई ठाकरे चौक, गोखले रोड आदींचा पुनर्विकास केला जाणार आहे. तर पूर्वेकडील केवळ स्टेशन परिसराचाच यात समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.
स्मार्ट सिटीचा आराखडा आता अंतिम टप्प्यात आला असून ठाणेकरांसह शहरातील ७० हून अधिक तज्ज्ञांनी नोंदविलेल्या मतप्रवाहानुसार ठाणे स्टेशन परिसराचा पुनर्विकास करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार आता पहिल्या टप्प्यात आणि रोल मॉडेल म्हणून येथील ७५० एकरांच्या परिसराचा पुनर्विकास करण्याचे पालिकेने निश्चित केले आहे.

पूर्वेत फक्त स्टेशन परिसराचाच विकास...
स्टेशनच्या पश्चिम भागाची सीमा जरी मीनाताई ठाकरे चौकापर्यंत असली तरी पूर्व भागात मात्र गर्दी आणि वाहतूककोंडी असलेल्या स्टेशन परिसराचाच या टप्प्यात पुनर्विकास होणार आहे. यात आधीच पूर्वेकडे सॅटीस प्रस्तावित आहे. तसेच बसस्टॉप, खाजगी बससाठी वेगळी व्यवस्था, रिक्षांसाठी थांबा, पादचारी मार्ग यांसह इतर पायाभूत सुविधांवर भर

750एकरांत नेमके काय?
पुनर्विकासाच्या या ७५० एकरांत ठाणे स्टेशन परिसर, गोखले रोड, दादोजी कोंडदेव स्टेडियम, मासुंदा तलाव, वंदना सिनेमा, मनोरुग्णालय, किसननगर, तीनहात नाका, मीनाताई ठाकरे चौक आणि ठाणे पूर्वेकडील स्टेशन परिसराचा समावेश असणार आहे.

स्ट्रक्चरल आॅडिटच महत्त्वाचे
या नव्याने निर्माण होणाऱ्या स्मार्ट सिटीत आजच्या घडीला सुमारे ८०० च्या आसपास धोकादायक इमारती आहेत. तर १७ अतिधोकादायक इमारती आहेत. ज्यामध्ये लाखो रहिवासी आजमितीस वास्तव्य करीत आहेत. त्या इमारतींचाही यामध्ये पुनर्विकास होणार असून हा विकास करताना ज्या इमारती ३० वर्षे जुन्या असतील, अशा इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करून त्या राहण्यास योग्य असतील तर त्या तोडण्यात येणार नाहीत. परंतु ज्या इमारती वापरास अयोग्य ठरतील, त्या पाडून त्यांचा पुनर्विकास केला जाणार आहे.

तलाव, मैदानांचाही विकास
या भागात ठाणेकरांची चौपाटी म्हणून ओळख असलेल्या मासुंदा तलावाचाही पुनर्विकास केला जाणार आहे. पर्यावरणपूरक स्टॉल, येणाऱ्या पर्यटकांसाठी विरंगुळ्याचे स्पॉट आदींसह इतर सुविधा पुरविल्या जाणार आहेत. तसेच या परिसरात येणाऱ्या उद्यांनाचा लूकही चेंज करण्याचा पालिकेचा मानस आहे. तसेच अस्तित्वात असलेल्या मैदानांचाही पुनर्विकास केला जाणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार नागरी सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

७० एकर परिसराचा पुनर्विकास...
ठाण्यातील अतिशय गजबजलेला आणि दाटीवाटीने वसलेला, अनधिकृत इमारती आणि आता अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींचा ओळखला जाणारा परिसर म्हणून किसननगर परिसराची ओळख आहे. या ठिकाणचे मुख्य रस्तेही कमी रुंदीचे आहेत. एका इमारतीमधून दुसऱ्या इमारतीत सहज जाता येते. परंतु या ठिकाणी पाणी, मलनि:सारण व्यवस्था, गटारे, नाले, उद्याने, मैदाने आदींसह इतर समस्या अधिक तीव्रपणे जाणवत आहे. परंतु, आता या रोल मॉडेलमध्ये येथील ७० एकर भागाचा पुनर्विकास होणार आहे.

 

Web Title: First Hatha Kissanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.