ठाण्याची कश्मिरा राज्यात प्रथम; महाराष्ट्रातील ७०हून अधिक उमेदवार यूपीएससीत यशस्वी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 06:08 AM2023-05-24T06:08:15+5:302023-05-24T06:08:23+5:30

महाराष्ट्रातील ७०हून अधिक उमेदवार यशस्वी झाले. यशवंतामध्ये राज्याचा १२ टक्के वाटा आहे.

First in Thane Kashmir state; More than 70 candidates from Maharashtra are successful in UPSC | ठाण्याची कश्मिरा राज्यात प्रथम; महाराष्ट्रातील ७०हून अधिक उमेदवार यूपीएससीत यशस्वी 

ठाण्याची कश्मिरा राज्यात प्रथम; महाराष्ट्रातील ७०हून अधिक उमेदवार यूपीएससीत यशस्वी 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : यूपीएससी परीक्षेत ठाण्यातील डॉ. कश्मिरा संखे यांनी राज्यात प्रथम आणि देशात २५ वा क्रमांक मिळवत ठाण्याच्या  शिरपेचात मानाचा तुरा राेवला. मेहनत, जिद्द आणि आई-वडिलांच्या पाठिंब्याच्या जोरावर हे यश संपादन केल्याचे मत कश्मिरा यांनी व्यक्त केले. 

महाराष्ट्रातील ७०हून अधिक उमेदवार यशस्वी झाले. यशवंतामध्ये राज्याचा १२ टक्के वाटा आहे. कश्मिरा या डेन्टिस्ट असून व्यवसाय सांभाळून त्यांनी हे यश संपादन केले. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा यूपीएससी परीक्षा दिली. प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीप्रमाणे त्यांनी यावेळी यशस्वी गरुडभरारी घेतली. माझे पहिले प्राधान्य आयएएस अधिकारी होण्याला आहे.  भारतात कोणत्याही ठिकाणी समर्पण भावनेने काम करेन, असे त्यांनी ठामपणे सांगितले. मी सद्गुरू वामनराव पै यांची प्रवचने ऐकली आहेत. बालसंस्कार केंद्रात जायचे तेथूनदेखील मला प्रेरणा मिळाली, असे त्यांनी सांगितले.  

यशस्विनी ‘चारचाैघी’ 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने मंगळवारी जाहीर केलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२२च्या निकालात दिल्ली विद्यापीठाची पदवीधर ईशिता किशोरने प्रथम क्रमांक पटकावला. पहिल्या चारही क्रमांकांवर मुलींनीच बाजी मारली आहे. गरिमा लोहिया, उमा हरथी एन आणि स्मृती मिश्रा यांनी परीक्षेत अनुक्रमे द्वितीय, तृतीय आणि चौथा क्रमांक पटकावला. गरिमा लोहिया आणि स्मृती मिश्रा याही दिल्ली विद्यापीठाच्या पदवीधर आहेत, तर उमा हरथी एन. आयआयटी, हैदराबाद येथील बी.टेक. पदवीधारक आहे. या प्रतिष्ठेच्या परीक्षेत महिला उमेदवारांनी पहिले तीन क्रमांक पटकावण्याचे हे सलग दुसरे वर्षे आहे.  

स्वप्न सत्यात उतरले 
nनागरी सेवा परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणे हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. 
nआयएएस झाल्यानंतर महिला सक्षमीकरणासाठी काम करेन, असे म्हणणाऱ्या यूपीएससी परीक्षेत प्रथम आलेल्या २६ वर्षीय ईशिता किशोरने तिसऱ्या प्रयत्नात प्रतिष्ठेची परीक्षा उत्तीर्ण केली. 
nकठीण काळात प्रोत्साहन देणाऱ्या कुटुंबीयांबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली. 

वृत्तपत्र वाचनाचा फायदा झाला  -  डॉ. कश्मिरा संखे 
यूपीएससीच्या परीक्षेकरिता १४ ते १५ तास अभ्यास केला. १५ मिनिटे अभ्यास आणि १० मिनिटे ब्रेक हा पॅटर्न अंमलात आणला होता. एका विषयासाठी मी क्लास लावला होता. बाकी इतर विषयांसाठी मी स्वयंअध्ययन केले. मला वाचनाची आवड आहे. वृत्तपत्र मी सातत्याने वाचत होते. वाचनाचा फायदा मला परीक्षेत झाला.  डॉक्टर बनण्याच्या आधीपासून मला सनदी सेवेत येण्याची इच्छा होती. डॉक्टर झाल्यावर रुग्णांच्या संपर्कात यायचे. त्यावेळी त्यांच्या खूप समस्या असल्याचे जाणवले. आपण आयएएस झाल्यावर त्या समस्या चांगल्या प्रकारे सोडवू शकतो, असे वाटायला लागले. याच इच्छाशक्तीने मी सनदी सेवेत येण्याचा ध्यास घेतला. आपल्या कुटुंबात कोणीही आयएएस नाही. मला माझ्या मित्रमैत्रिणींचा या प्रवासात खूप पाठिंबा लाभला. सगळ्यांनी केलेले सहकार्य आणि पाठिंब्याशिवाय हे यश मिळणे शक्य झाले नसते. अभ्यास आणि काम यांचा योग्य ताळमेळ मी घालू शकले.
 

Web Title: First in Thane Kashmir state; More than 70 candidates from Maharashtra are successful in UPSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.