एसआरव्ही ममता हॉस्पिटलमध्ये लिंग परिवर्तनाचा पहिला टप्पा यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 05:54 PM2019-06-21T17:54:43+5:302019-06-21T17:55:09+5:30
२५ वर्षीय स्त्रीचे पुरुषामध्ये रूपांतर; दुसऱ्या टप्प्यात लिंग बदलण्याची शस्त्रक्रिया होणार
डोंबिवली : येथील एसआरव्ही ममता हॉस्पिटलमधील डॉक्टर्सनी डोंबिवलीत राहणा-या २५ वर्षीय रुग्णावर लिंग परिवर्तन शस्त्रक्रियेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पाडला. या रुग्णाला जेंडर आयडेंटिटी डिसऑर्डर किंवा जेंडर डिस्फोरिया या विकाराने ग्रासले होते. या शस्त्रक्रियेच्या मदतीने रुग्णाचे लिंग बदलून त्याचे स्त्रीमधून पुरुषात रूपांतर करण्यात आले आणि एक सामान्य आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असलेली नवीन ओळख त्याला मिळणार असून त्या शस्त्रकियेचा पहिला टप्पा यशस्वी झाला असून दुस-या टप्प्यात लिंग बदल करण्यात येणार असल्याची माहिती हॉस्पिटलच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आली.
डोंबिलवीत राहणारा २५ वर्षांचा आदित्य. त्याचे पूवीर्चे नाव अदिती खुराना (नाव बदलले आहे). आदित्यने सेक्स रिअसाइनमेंट शस्त्रक्रिया करवून घेऊन स्त्रीपासून पुरुष झाला.आदित्य तो जन्माला आला स्त्री म्हणून. आपण ज्या लिंगाशी तादात्म्य पावतो त्याहून वेगळ्याच शरीरात आपण अडकलो आहोत अशी भावना त्याला १३ वर्षांचा झाला तेव्हा चांगलीच जाणवू लागली होती. आदित्यला लवकरच वाटू लागले की लिंगबदल शस्त्रक्रियेचा पर्याय निवडणे आवश्यक आहे. कारण, तसे केले नाही, तर त्याचे आयुष्य कायम अर्धवट खरे व अर्धवट समाधान देणारे राहील. अर्थात, अनेक वर्षे त्याने हा विचार स्वत:जवळच ठेवला. तो कुटुंबियांपुढे व्यक्त करण्याचे धैर्य त्याच्याकडे नव्हते. तीन वर्षांपूर्वी त्याने त्याच्या आईजवळ भावना व्यक्त केल्या आणि लिंग बदलण्यासाठी शस्त्रक्रिया करवून घेण्याचा विचार बोलून दाखवला. सुरुवातीला घरच्या अन्य सदस्यांनी नकार दिला होता, पण कालांतराने त्यास मंजूरी मिळाली आणि शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली.
त्या समस्येसंदर्भात आदित्यसह कुटूंबियांनी डोंबिवलीतील एसआरव्ही ममता हॉस्पिटलला भेट दिली. त्याची स्थिती जेंडर आयडेंटिटी डिसआॅर्डर किंवा जेंडर डिस्फोरियामध्ये मोडते की नाही याचे निदान करण्यासाठी तेथे एका कृतीयोजनेला सुरुवात करण्यात आली. जेंडर डिस्फोरिया म्हणजे भावनिक-मानसिक ओळख ही एखाद्याला जन्माला मिळालेल्या जीवशास्त्रीय लिंगाहून वेगळी आहे असे वाटण्याची अवस्था. अशा परिस्थितीत जेंडर डिसफोरिया झालेल्या व्यक्तींवर शस्त्रक्रिया करून ते ज्या लिंगाशी तदात्म्य पावतात, त्यामध्ये त्यांचे रूपांतर केले जाते. आदित्यला जेंडर रिअसाइनमेंट सर्जरी (जीआरएस) करवून घ्यायची होती. या शस्त्रक्रियेला सेक्स रिअसाइनमेंट सर्जरी (एसआरएस) असेही म्हटले जाते.
यासाठी अनेक मानसशास्त्रीय चाचण्या व मूल्यमापनांना सामोरे जावे लागते. यामध्ये कोणत्याही प्रकारची सायकोपॅथोलॉजी नाही हे निश्चित करण्यासाठी या चाचण्या व मूल्यमापन अत्यावश्यक आहे. एसआरएस ही एक अपरिवर्तनीय प्रक्रिया असून व्यक्तीच्या आयुष्यावर अनेक बाजूंनी परिणाम करते. त्यामुळे हा निर्णय करणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या उत्तम स्थितीत आहे की नाही हे निश्चित करणे आवश्यक ठरते. आदित्यचे दोन महिने परीक्षण करावे लागल्याचे सांगण्यात आले. त्याला हायपोथायरॉइडिझमचा त्रास होता. त्यामुळे औषधांच्या मदतीने थायरॉइडची पातळी सामान्य झाल्यानंतर त्याला शस्त्रक्रियेसाठी तंदुरुस्त ठरवण्यात आले. त्याच्यावर डोंबिवली येथील एसआरव्ही ममता हॉस्पिटलमध्येच शस्त्रक्रिया करण्यात आली. आदित्यवरील शस्त्रक्रियेचे नियोजन दोन टप्प्यांत करण्यात आले. पहिला टप्पा होता दोन्ही बाजूंचे स्तन कमी करत नेण्याचा. यासाठी बायलॅटरल सॅल्पिंगो-ऊफेरिओहिस्ट्रेक्टॉमी करण्यात आली.
यामध्ये स्तनांचे आकारमान कमी करण्यासोबतच गर्भाशय, अंडाशये आणि गर्भनलिका (फलोपिअन ट्युब्ज) हे सर्व काढून टाकण्यात आले. आदित्यला आठवडाभरात रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. दुस-या टप्प्यामध्ये त्याच्यावर जननेंद्रियांची स्थापना करण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाईल. त्यानंतर त्याला त्याच्या लैंगिक ओळखीशी (जेंडर आयडेंटिटी) जुळणारी शारीरिक रचना प्राप्त होईल. एसआरव्ही ममता हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर पवार यांनी त्यांच्या वैद्यकिय पथकासह हॉस्पिटलच्या सर्व स्टाफचे आभार मानले. ही महत्त्वपूर्ण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांबद्दल समाधान व्यक्त केले.