आरास स्पर्धेत गुणसागरनगर मंडळाला प्रथम पारितोषिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 12:28 AM2019-09-09T00:28:22+5:302019-09-09T00:28:31+5:30
ठाणे महानगरपालिकेची स्पर्धा : गोकूळनगरच्या जयभवानीला मिळाले उपविजेतेपद; २० संघांचा सहभाग
ठाणे : ठाणे महानगरपालिकेने २०१९ या वर्षासाठी आयोजित केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेमध्ये कळवा येथील गुणसागरनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने प्रथम पारितोषिक पटकाविले. गोकूळनगर येथील जयभवानी मित्र मंडळाने द्वितीय तर वॉकरवाडी येथील शिवगर्जना मित्र मंडळाने तिसरा क्र मांक पटकविला. स्पर्धेचा निकाल महापौर मीनाक्षी शिंदे यांनी शुक्रवारी जाहीर केला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेचे आयोजन केले होते. शहरातील एकूण २० मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये प्रथम आलेल्या कळवा येथील गुणसागरनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने भारतीय शिक्षण पद्धतीवर आधारीत देखावा साकारत पूर्वीची आणि सध्याची शिक्षणपद्धती यातील फरक चित्रफितीच्या माध्यमातून दाखविला आहे. इंग्रजीच्या पुस्तकातील ‘लंडन ब्रीज इज फॉलिंग डाऊन’ ही कविता भारतातील मुलांनी का शिकावी, जो पूल भारतात नाही, त्यावर आधारित कविता सध्या अभ्यासक्र मात आहे, अशा अनेक गोष्टी मंडळाने चित्रफितीद्वारे समाजासमोर मांडल्या आहेत. तर द्वितीय क्र मांक पटकविणाऱ्या आझादनगर क्रमांक दोन गोकूळनगर येथील जयभवानी मित्र मंडळाने श्रीगणेशाचे वाहन उंदीरमामा यांच्या व्यथा आणि दु:ख आदींबाबतचा देखावा साकारला आहे. तृतीय क्रमांक पटकविलेल्या वॉकरवाडीतील शिवगर्जना मित्र मंडळाने चित्रकलेच्या वस्तुंपासून सुंदर कलाकृती साकारली आहे. याशिवाय, श्रीरंग सोसायटीतील श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ (स्वच्छ भारत), नौपाड्यातील बी केबिन येथील नवतरुण मित्र मंडळ ( आई वडीलांची सेवा हीच ईश्वर सेवा: तरुण पिढीच्या डोळ्यात अंजन घालणारा देखावा), वागळे इस्टेट येथील जयभवानी सार्वजनिक उत्सव मंडळ (सोशल मिडियामुळे लोप पावत चाललेली लोककला, लावणी आदींची माहिती चित्रकलेतून साकारली), मुंब्रा येथील अमर मित्र मंडळ (लहानपण देगा देवा) आणि शिवाईनगर येथील शिवाईनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने (गणेशोत्सव एक स्पर्धा) यांना अनुक्रमे चौथे ते आठव्या क्रमांकाचे बक्षिस जाहीर झाले. याशिवाय, स्वच्छतेचा विशेष प्रथम पुरस्कार वागळे इस्टेट येथील जयभवानी नगरच्या सार्वजनिक उत्सव मंडळाला मिळाला. द्वितीय- सावरकरनगर येथील ओंकारेश्वरनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि तृतीय वागळे इस्टेटच्या जिजामातानगर येथील चैतन्य मित्र मंडळाने पटकविले आहे. उत्कृष्ट मूर्तीकाराचे पहिले बक्षिस महादेव नांदिवकर (पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळा, ठाणे) द्वितीय- सुनील गोरे (एकविरा मित्र मंडळ, ठाणे) आणि तिसरे खोपट येथील कोलबाड मित्र मंडळाच्या मूर्तीसाठी दीपक गोरे यांना जाहीर झाले आहे.