पक्षी निरीक्षण स्पर्धेत शाहीन ससाणा संघाला प्रथम पारितोषिक; 150 हून अधिक पक्ष्यांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 02:47 PM2018-02-13T14:47:22+5:302018-02-13T14:48:50+5:30
ठाणे रायगड जिल्हा पक्षीमित्र संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पक्षी निरीक्षण स्पर्धेत शाहीन ससाणा संघ या गटाने 154 पक्षी प्रजातीची नोंद करून प्रथम पारितोषिक पटकाविले आहे
डोंबिवली- ठाणे रायगड जिल्हा पक्षीमित्र संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पक्षी निरीक्षण स्पर्धेत शाहीन ससाणा संघ या गटाने 154 पक्षी प्रजातीची नोंद करून प्रथम पारितोषिक पटकाविले आहे. पक्षी निरीक्षण स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रोटरी क्लबच्या सभागृहात पार पडला. या स्पर्धेत 52 संघ (220 ) जणांनी सहभाग घेतला होता. दरवषीच्या तुलनेत यंदा या स्पर्धेला स्पर्धकांकडून जास्त प्रतिसाद मिळाला आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त शालेय विद्यार्थ्यांचा समावेश करून त्यांच्या मनात निसर्गा ची आवड निर्माण करणे, पक्षी संवर्धन आणि पक्षीनिरीक्षण याबद्दल आवड निर्माण करणो हा यामागे उद्देश होता. सातवी ते दहावीच्या 30 पेक्षा जास्त संघानी शालेय गटात नोंदणी केली होती. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांना ही स्पर्धेचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांनी ही नजीकच्या पक्षी निरीक्षण स्थळाला भेटी दिल्या. 150 हून अधिक पक्ष्यांची नोंद या स्पर्धेत करण्यात आली.
या स्पर्धेत द्वितीय क्रमांक कृष्ण गरूड व लघुकर्ण घुबड या दोन संघानी मिळविला. या दोन्ही संघानी 144 पक्षी प्रजातीची नोंदणी केली. सर्वाधिक पक्षी नोंदी महाविद्यालयीन गटातून पराग्रीन ससाणा यांनी केली. या संघात शादरुल साळवी, ऐश्वर्या आणि साकेत या विद्यार्थ्यांचा समावेश होता. शालेय गटातून सर्वाधिक पक्षी नोंदी कौकर या गटाने केली. या गटात मुकुल केंद्रे, अथर्व केरूर, आदित्य केरकर, उदय कवाडे, आदित्य चेक्काले यांचा समावेश होता. बर्ड ऑफ द डे म्हणजेच आजचा विशेष पक्षी यांचे पारितोषिक दोन संघाने देण्यात आले. काळा करकोचा हा विशेष पक्षी ठरला. गरूड संघ यामध्ये आर्या खातू, मैथिली, वैष्णवी, साक्षी, आदित्य यांनी पारितोषिक मिळविले. तर दुसरा चिमणी संघाने हे पारितोषिक पटकाविले. त्यामध्ये आचल भारद्वाज, निकिता, साक्षी, धैर्य हे होते.
स्पर्धेच्या पारितोषिक समारंभाला संघटनेचे प्रशांत पाटील , हिमांशू टेबेंकर, किरण कदम, स्वप्नील कुलकर्णी, प्रतिक प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते. पक्षीतज्ञ संजय मोगा, सुधीर गायकवाड यांनी स्पर्धकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून पारितोषिक प्रायोजित केली आहेत. वन्य या अॅपचे यावेळी उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिमांशू टेबेंकर यांनी केले. स्पर्धेचे परिक्षण पक्षीतज्ञ अमेय केतकर, ऋतुजा फडके, बीएनएचएस संस्थेचे राजू कसंबे यांनी केले.