ठाण्यात पावसाचा पहिला बळी: दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने मुलीचा मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 19:13 IST2018-06-09T19:13:20+5:302018-06-09T19:13:20+5:30
पहिल्या पावसाचा आनंद घेत दुचाकीवरुन मैत्रिणीसोबत जाणाऱ्या प्रियंका झेडे या मागे बसलेल्या २२ वर्षीय तरुणीचा टँकरच्या धडकेने मृत्यु झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. पावसामुळे खड्डयाचा अंदाज न आल्याने तिचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानंतर हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घोडबंदर रोड नागला बंदर येथील घटना
ठाणे : घोडबंदर रोडवरील नागलाबंदर भागात खड्डा चुकवितांना आपल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने प्रियंका झेंडे (२२, रा. लोकमान्यनगर, ठाणे) या तरुणीचा मृत्यु झाला. तर तिची मैत्रिण तन्वी वसंत बोलाडे (२२, रा. यशोधननगर, ठाणे) ही जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.
गायमुखमार्गे ठाण्याच्या दिशेने या दोघी पहिल्याच पावसाचा आनंद लुटत दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास येत होत्या. कासारवडवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तन्वी दुचाकी चालवत होती. तर प्रियंका तिच्या मागे बसली होती. एक खड्डा चुकवितांना तन्वीचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. तशा या दोघी खाली कोसळल्या. त्याचवेळी मागून आलेल्या एका टँकरची प्रियंकाला धडक असली. तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिच्या डोक्याला मार लागल्यामुळे तिचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. प्रियंकाला टँकरची धडक बसली की खाली पडल्याने मार लागला याबाबत नेमकी माहिती नसल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अपघाती मृत्युची कासारवडवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
‘‘ या अपघातात दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळे तन्वीचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यात मागे बसलेली प्रियंकासह दोघीही खाली कोसळल्या. त्यावेळी एका टॅकरची प्रियंकाला धडक बसली. यात डोक्याला मार लागल्यामुळे तिचा मृत्यु झाला.’’
नासीर कुलकर्णी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कासारवडवली पोलीस ठाणे.