आधी मीरा-भाईंदरचे बोला, मगच ठाण्यात स्थायीचा वाटा मागा, शिवसेनेचा भाजपला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 12:23 AM2019-05-28T00:23:00+5:302019-05-28T00:23:06+5:30
स्थायी समिती सदस्यांची चुकीच्या पद्धतीने निवड करून सत्ताधारी शिवसेनेने आधीच स्थायी समिती गठीत करण्यात खोडा घातला आहे.
- अजित मांडके
ठाणे : स्थायी समिती सदस्यांची चुकीच्या पद्धतीने निवड करून सत्ताधारी शिवसेनेने आधीच स्थायी समिती गठीत करण्यात खोडा घातला आहे. त्यात आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाल्यानंतर स्थायी समिती किमान एक वर्षासाठी मिळेल, अशी आशा भाजपला होती. परंतु, आधी मीरा-भार्इंदरचे बोला, मगच ठाण्यात स्थायी समितीचा वाटा मागा, असा सल्ला शिवसेनेने भाजपला दिल्याची माहिती समोर आली आहे. मीरा-भार्इंदरमुळेच ठाण्यात शिवसेनेने भाजपची साथ न घेता त्यांना स्थायीपासून दूर ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर
आली आहे.
स्थायी समिती सदस्यांची निवड काही दिवसांपापूर्वी करण्यात आली आहे. परंतु, या सदस्यनिवडीवरून राष्टÑवादीने आक्षेप घेतला आहे. चुकीच्या पद्धतीने सदस्यांची निवड करून स्थायी समिती गठितच न करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप करून स्थायी समितीत येणारे विषय थेट महासभेत नेऊन मंजुरीचा घाट घातला जात असल्याचेही राष्टÑवादीचे म्हणणे आहे.
दुसरीकडे सत्ताधारी शिवसेनेने स्थायीपासून केवळ राष्टÑवादीलाच नाही, तर भाजपलासुद्धा दूर ठेवल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजपमध्ये झालेल्या वादावर दोन्ही पक्षांतील वरिष्ठांनी केलेल्या मध्यस्थीनंतर पडदा पडला होता. परंतु, यावेळेस भाजपने स्थायी समितीत वाटा हवा असल्याचा हट्ट धरला आहे. शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळ आल्यानंतर त्याबाबत विचार केला जाईल, असेही स्पष्ट केले होते.
>भाजपला जर ठाण्यात स्थायी समितीमध्ये वाटा हवा असेल, तर आधी भाजपने मीरा-भार्इंदरमध्ये सत्तेत वाटा द्यावा, अशी मागणी शिवसेनेने लावून धरली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये भाजपचे आमदार नरेंद्र मेहता हे शिवसेनेला वाटा देण्यास तयार नाहीत. त्यामुळे ठाण्यात वाटा कसा मिळवायचा, असा पेच भाजपपुढे आहे. वरिष्ठ पातळीवर युती झाली असली, तरी स्थानिक पातळीवर युतीत तेढ असल्याचेच चित्र यानिमित्ताने दिसून येत आहे.