कॅन्सरशी लढा देत आयुषी महाविद्यालयात सर्वप्रथम
By admin | Published: May 31, 2017 06:06 AM2017-05-31T06:06:07+5:302017-05-31T06:06:07+5:30
तिचा कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी लढा सुरु आहे...दहा बाय दहाच्या घरातील दारिद्र्यामुळे तिच्या शिकण्यात
प्रज्ञा म्हात्रे/लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : तिचा कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी लढा सुरु आहे...दहा बाय दहाच्या घरातील दारिद्र्यामुळे तिच्या शिकण्यात वडिलांना स्वारस्य नाही... अचानक घर सोडून निघून गेलेले आजोबा परत आले नसल्याने त्या घटनेचे सावट कायम आहे... अशा एक ना अनेक संकटांचे डोंगर पार करत आयुषी धुवड या ज्ञानसाधना महाविद्यालयातील विद्यार्थिनीने बारावीच्या परीक्षेत ७९.२३ टक्के मिळवून महाविद्यालयात सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकवला आहे. परीक्षेत उत्तीर्ण झालेली आजूबाजूची मुलं-मुली पेढे वाटत होते. त्यांचे कोडकौतुक होत होते. पण आयुषीच्या पाठीवर ना कुणी कौतुकाची थाप दिली ना कुणी तिच्या यशाचा आनंद पेढे वाटून साजरा केला. तिनेच अक्षरश: रडत रडत आपली ही कहाणी ‘लोकमत’ला कथन केली.
आयुषी ही कला शाखेची विद्यार्थिनी आहे. ती श्रीनगर येथील वारली पाडा परिसरातील झोपडपट्टीत दहा बाय दहाच्या खोलीत राहते. आठवीत असताना तिच्या शरीरात गाठ असल्याचे आढळले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ती औषधोपचार घेत होती. परंतु गाठ हळूहळू मोठी होत गेल्याने अन्य एका डॉक्टरांनी ताबडतोब आॅपरेशन करण्यास सांगितले. बारावीच्या वर्षाला शिकत असतानाच तिचे आॅपरेशन झाले. आॅपरेशनचा खर्च २५ हजार रुपये आला. पण धुवड कुटुंबाकडे पैसे नसल्याने तिच्या आईने कर्ज काढले. सुरूवातीला डॉक्टरांनी ही कॅन्सरची गाठ असल्याची कल्पना दिली नाही. आॅपरेशन झाल्यावर त्यांनी आयुषीला विश्वासात घेऊन हे सांगितले. तिला मानसिक धक्का बसला. काही दिवसांपूर्वीच तिचा चुलत भाऊ कॅन्सरने दगावला होता. दिवाळीच्या सुमारास तिचे आजोबा हरवले ते अद्याप सापडले नाहीत. बारावीच्या वर्षात एकामागून एक दुर्दैवी घटनांचे आघात तिच्यावर झाले. मात्र आयुषी डगमगली नाही. परीक्षा जवळ येताच रात्रं-दिवस मेहनत करुन तिने महाविद्यालयात कला शाखेतून प्रथम येण्याचा मान पटकावला. अकरावी इयत्तेत असतानाही ती महाविद्यालयातून प्रथम आली होती. तिला एमए करायचे असून शिक्षक व्हायचे आहे. इतर मुलांना शिकवण्याचा आनंद काही वेगळाच आहे, असे तिने हसतमुखाने सांगितले.
आयुषीचे वडील सकाळी गाडी धुण्याचे काम करतात आणि त्यानंतर सेल्समनची नोकरी करतात. आई सकाळी ८ ते रात्री दहा वाजेपर्यंत धुण्याभांड्याची कामे करते. लहान भाऊ इयत्ता पाचवीमध्ये आहे. त्याच्या पुढील शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी ती लहान मुलांचे क्लासेस घेते.
आयुषी उत्तम गुण मिळवून सर्वप्रथम आली याचा आनंदोत्सव सोडाच पण साधी कौतुकाची थाप घरातून कुणी तिच्या पाठीवर मारली नाही. माझ्यासाठी कुणी पेढे आणले नाहीत हे सांगताना तिच्या डोळ््यांत अश्रू तरळले. दहावी झाल्यावर वडिलांनी मला शिकायचे नाही. घरातील कामे कर, असे बजावले होते. तरीही मी जिद्दीने बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. मला खूप शिकायचे आहे... असे सांगणाऱ्या आयुषीच्या नजरेत मात्र कमालीची जिद्द आणि आत्मविश्वास आहे. संकटांचे हजारो पहाड भुईसपाट करण्याची ताकद त्यामध्ये आहे...
फोटो आयुषी धुवड
टेबल टेनिसपटू अनिरुद्ध महाविद्यालयात प्रथम
बारावीचे वर्ष असताना वर्षभर २० स्पर्धांमध्ये यश प्राप्त करुन केवळ एका महिन्याच्या अभ्यासाच्या बळावर ८६ टक्के गुण मिळवत राष्ट्रीय टेबल टेनिसपटू अनिरुद्ध मराठे याने ज्ञानसाधना महाविद्यालयात विज्ञान शाखेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. अनिरुद्ध हा गेली पाच वर्षे टेबल टेनिस खेळत आहे. गेल्या चार वर्षांत त्याने या खेळात लक्षणीय कामगिरी केली आहे. आतापर्यंत त्याने तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावले आहे. वर्ल्ड स्कुल गेम्ससाठी त्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
बारावीचे वर्ष असताना वर्षभर २० स्पर्धांमध्ये यश प्राप्त करुन केवळ एका महिन्याच्या अभ्यासाच्या बळावर ८६ टक्के गुण मिळवत राष्ट्रीय टेबल टेनिसपटू अनिरुद्ध मराठे याने ज्ञानसाधना महाविद्यालयात विज्ञान शाखेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. अनिरुद्ध हा गेली पाच वर्षे टेबल टेनिस खेळत आहे. गेल्या चार वर्षांत त्याने या खेळात लक्षणीय कामगिरी केली आहे. आतापर्यंत त्याने तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावले आहे. वर्ल्ड स्कुल गेम्ससाठी त्याची नियुक्ती करण्यात आली आहे.