घोडबंदर किल्ल्याच्या ऐतिहासिक वारशाला उजाळा देण्यासाठी पहिल्यांदाच महोत्सवाचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2018 05:08 PM2018-03-02T17:08:14+5:302018-03-02T17:08:14+5:30

घोडबंदर किल्ल्याच्या ऐतिहासिक वारशाला उजाळा देण्यासाठी विविध संस्थांच्या सहकार्याने भाजपाने अश्वमेध घोडबंदर फोर्ट फेस्टिव्हलचे आयोजन येत्या रविवारी ४ मार्च रोजी करण्यात आल्याची माहिती घोडबंदर गावचे ग्रामस्थ तथा उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी दिली आहे.

For the first time, the festival was organized to light the historical heritage of Ghodbunder Fort | घोडबंदर किल्ल्याच्या ऐतिहासिक वारशाला उजाळा देण्यासाठी पहिल्यांदाच महोत्सवाचे आयोजन

घोडबंदर किल्ल्याच्या ऐतिहासिक वारशाला उजाळा देण्यासाठी पहिल्यांदाच महोत्सवाचे आयोजन

googlenewsNext

मीरारोड : घोडबंदर किल्ल्याच्या ऐतिहासिक वारशाला उजाळा देण्यासाठी विविध संस्थांच्या सहकार्याने भाजपाने अश्वमेध घोडबंदर फोर्ट फेस्टिव्हलचे आयोजन येत्या रविवारी ४ मार्च रोजी करण्यात आल्याची माहिती घोडबंदर गावचे ग्रामस्थ तथा उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी दिली आहे.

शिवजयंती निमित्त या एकदिवसीय महोत्सवाचे आयोजन होत असून अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच होत आहे. १५ व्या शतकात पोर्तुगिजांच्या काळात येथे त्यांचा घोड्यांचा व्यापार चालत असे. त्यामुळे याला घोडबंदर असे नाव पडले. तर सह्याद्रीची एक सोंड येथील उल्हास नदीच्या टोकाला उतरते. ते टोक घोड्या सारखे दिसते म्हणून घोडबंदर असे नाव पडल्याचे देखिल सांगितले जाते. घोडबंदर किल्ला हा १७३७ साली पोर्तुगिजांकडून मराठ्यांनी जिंकून घेतला. त्या आधी देखील सदर किल्ला जिंकण्याचा प्रयत्न मराठ्यांनी केला होता. १८१८ मध्ये सदर किल्ला ब्रिटिशांनी ताब्यात घेतला. येथून त्यांनी त्यांचे जिल्हा प्रशासकीय कामकाज सुरु केले.

सद्या पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेल्या किल्ल्याचे बुरुज, तटबंदी व आतील बांधकामांच्या भिंतींचे केवळ अवशेषच उरले आहेत. पोर्तुगिजांच्या काळातील एका पुरातन बांधकामात हॉटेल चालवले जात आहे. किल्याच्या आवारात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होऊन अनधिकृत बांधकामे झाली आहेत. बेकायदा खोदकाम झाले आहे. या ठिकाणी पुर्वी चालणारया चित्रपटांच्या शूटिंग दरम्यान देखिल किल्ल्याची मोठी वाताहत झालेली आहे.

दुरावस्थेत असलेल्या किल्ल्याचे संवर्धन व सुशोभिकरण करुन पर्यटनासाठी तो खुला करण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून स्थानिक शिवसेना आमदार प्रताप सारनाईक यांच्या कडुन सुरु आहेत. त्यासाठी वेळोवेळी किल्लयाची पाहणी करण्यात आली असून निधी देखील मंजुर करण्यात आलाय. परंतु किल्ला सुशोभिकरणासाठी पालिकेच्या चालु अर्थसंल्पाच्या तरतुदीतील एक पैसाही वापरण्यात आला नाही. उलट हा निधी सत्ताधारी भाजपाने ठराव करुन अन्य कामांसाठी वर्ग केलाय.

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमीत्ताने भाजपाने रविवार ४ मार्च रोजी दुपारी २ ते रात्री ८ दरम्यान अश्वमेध घोडबंदर फोर्ट फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. दुपारी २ ते ५ वेळात पोवाडा गायन, वक्तृत्व, छायाचित्र, चित्रकला, नृत्य आदी स्पर्धा होणार आहेत. १० ते १४ व १४ वर्ष वरील अशा दोन गटात या स्पर्धा होती. या स्पर्धांसाठी शाहिर निशांत अमर शेख, चित्रकार विजयराज बांधनकर, मंदार आणि प्रीती वाळुसकर, नृत्यांगना प्रदन्या कोळी-भगत सह एकुण ३० परिक्षक असतील. या वेळी अनुलोम संस्थे तर्फे सरकारी योजनांची माहिती दिली जाईल.

सायंकाळी ५ च्या सुमारास किल्ल्याच्या पायथ्यापासून शोभायात्रा व सायकल रॅली काढली जाणार आहे. यात पारंपारिक वेशभूषेत स्थानिक ग्रामस्थ, विद्यार्थी व नागरीक सहभागी होतील. शोभायात्रा किल्ल्यावर पोहचल्यावर मुख्य कार्यक्रमास सुरवात होणार आहे. गावातील स्थानिक तरुणांच्या सॅक्सोफोन वादनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. पहिल्यांदाच किल्ल्याला नेत्रदीपक अशा रोषणाईने प्रकाशमान करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या २६ जानेवारी रोजी दिल्लीच्या राजपथ वर सादर केलेल्या शिवाजी महाराजांचा दरबार सादर केला जाणार आहे.

कल्याण ते वसई खाडी किनारयावर अनेक ऐतिहासिक किल्ले असून त्यांची दुरावस्था झालेली आहे. या ऐतिहासिक किल्ल्यांचे संवर्धन व जतन करण्यासह पर्यावरणा सोबत पर्यटनाचा मार्ग खुला करण्याचा प्रयत्न या महोत्सवाच्या माध्यमातून करत असल्याचे चंद्रकांत वैती म्हणाले. मीरा भार्इंदरकरांसह ठाणे व पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या गौरवशाली इतिहासाचा मागोवा घेण्याच्या दृष्टीने महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन वैती यांनी केले आहे.
 

Web Title: For the first time, the festival was organized to light the historical heritage of Ghodbunder Fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे