लेक वाचवा उपक्रमांतर्गत मुलीच्या नावे पालिका अंदाजपत्रकात पहिल्यांदाच निधीची तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 08:02 PM2018-03-25T20:02:34+5:302018-03-25T20:02:34+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेने स्थायीला सादर केलेल्या अंदाजपत्रकात भाजपा सत्ताधा-यांनी पहिल्यांदाच ज्येष्ठ नगरसेविका प्रभात पाटील यांच्या सूचनेनुसार माझी कन्या सुकन्या या उपक्रमांतर्गत शहरात जन्म घेणा-या मुलीच्या नावे २५ लाखांच्या निधीची तरतूद केली आहे.
राजू काळे
भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने स्थायीला सादर केलेल्या अंदाजपत्रकात भाजपा सत्ताधा-यांनी पहिल्यांदाच ज्येष्ठ नगरसेविका प्रभात पाटील यांच्या सूचनेनुसार माझी कन्या सुकन्या या उपक्रमांतर्गत शहरात जन्म घेणा-या मुलीच्या नावे २५ लाखांच्या निधीची तरतूद केली आहे.
हा उपक्रम पाटील यांनी गेल्या काही वर्षांपासून केवळ आपल्या प्रभागापुरती मर्यादित ठेवला होता. मात्र त्यात जन्म झालेल्या मुलीच्या आईचा सत्कारच जागतिक महिला दिनीचे औचित्य साधून केला जात होता. यंदाही पाटील यांनी दरवर्षीप्रमाणे १० मार्चला जागतिक महिला दिनाचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे प्रभागात जन्म झालेल्या मुलींच्या आईच्या सत्काराचे प्रयोजन केले होते. या कार्यक्रमाला भाजपाचे स्थानिक आ. नरेंद्र मेहता यांनी हजेरी लावली होती. त्यांच्या लक्षात सदर बाब आल्याने त्यांनी त्याची संपूर्ण माहिती पाटील यांच्याकडून घेतली. त्यांच्या या उपक्रमाची मेहता यांनी स्तुती करून तो केवळ प्रभागापुरती मर्यादित न ठेवता संपुर्ण शहरात त्याची सुरुवात करता येईल का, अशी विचारणा त्यांनी पाटील यांच्याकडे केली. त्यावर पाटील यांनी पालिकेच्या बेटी बचाव योजनेंतर्गत शहरात अंगणवाडीपासून ते स्वयंरोजगाराच्या अनुषंगाने महिलांना प्रशिक्षण दिले जात असल्याचे मेहता यांच्या निदर्शनास आणुन देत त्यासाठी वेगवेगळ्या लेखाषीर्शकाखाली निधीची तरतूद केली जात असल्याचे सांगितले.
त्यात माझी कन्या सुकन्या योजनेंतर्गत निधीची तरतूद करण्याची सुचना पाटील यांनी मेहता यांना केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मेहता यांच्या मार्गदर्शनाने पालिकेचे स्थायी सभापती ध्रुवकिशोर पाटील यांनी त्याच योजनेच्या माध्यमातून पहिल्यांदाच शहरात दरवर्षी जन्म घेणा-या लेकींसाठी २५ लाखांच्या निधीच्या तरतूदीचा समावेश केला आहे. त्यावर आजच्या महासभेत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या निधीतून शहरात जन्मलेल्या मुलीच्या नावे निश्चित रक्कमेची दिर्घ मुदतीची ठेव पालिकेकडून बँकेत ठेवली जाणार आहे. त्या ठेवीद्वारे त्या मुलीच्या खात्यात जमा होणारी रक्कम तीला अथवा तीच्या पालकांना मुलगी १८ वर्षे वय पुर्ण केल्यानंतर काढता येणार आहे. या योजनेचा लाभ त्या जन्मलेल्या मुलीला निश्चित वेळेत मिळावा, यासाठी तीचे पालक अथवा नातेवाईकांना आवश्यक कागदपत्रांसह पालिकेला संपर्क साधावा लागणार आहे. मात्र त्या मुलीच्या नावे किती रक्कम ठेव म्हणुन ठेवली जाणार आहे, त्याचा आकडा अद्याप निश्चित झाला नसून त्यावर लवकरच महासभेत धोरण ठरुन रक्कम ठरविली जाणार आहे.