प्रथमच साडेअकरा हजार हेक्टरवर तुरीचा पेरा; समाधानकारक पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 12:25 AM2020-09-10T00:25:07+5:302020-09-10T00:25:14+5:30
भातपिकासह कडधान्यलागवड पूर्ण, बांधावरच उपलब्ध करुन दिले बियाणे
ठाणे : यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली असली तरी, आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात ९९.१० टक्के पाऊस झाला आहे. त्याचा शेतकऱ्यांना लाभ झाला असून खरीप हंगामातील भातासह तृण व कडधान्य पिकांची लागवड पूर्ण झाली आहे. यामध्ये तुरीचे क्षेत्र वाढविण्यासाठी बांधावर शेतकऱ्यांना तिचे बियाणे उपलब्ध करून दिल्याने ११ हजार ५५० हेक्टरवर तिची लागवड झाली असल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली.
यंदा पावसाने जून महिन्यात कमी प्रमाणात हजेरी लावली. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. मात्र, जुलै व आॅगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावून गेला. जिल्ह्यात प्रामुख्याने भाताचे पीक घेण्यात येत असते. त्याच्या सरासरी ५४ हजार ९५१.३८ हेक्टर क्षेत्रापैकी ५४ हजार ५८५ (९९.३३ %) हेक्टरवर लागवड झाली आहे.इतर तृणधान्य पिकांचे सरासरी क्षेत्र तीन हजार ५८३.४४ हेक्टर असून एक हजार ७०३ हेक्टरवर लागवड झाली. कडधान्य पिकांचे सरासरी क्षेत्र एक हजार २५२.४९ हेक्टर आहे.
जिल्ह्याचे खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ५९८९९.५४ हेक्टर असले, तरी यंदा त्यात वाढ होऊन शेतकºयांनी ६०९०९ हेक्टरवर लागवड केली आहे. यात विशेष लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे कडधान्य पिकांतर्गत तूर पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी हेतुपुरस्सर प्रयत्न करून त्यासाठी शेतकºयांना ४१.३७ क्विंटल बियाणे बांधावर उपलब्ध करून दिल्यामुळे ११,५५० हेक्टर क्षेत्रावर तिची लागवड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने यांनी दिली. दरम्यान, खरीप हंगामात उत्तम व दर्जेदार पिके घेता यावी, याकरिता जिल्हा कृषी विभागाच्या वतीने पीक प्रात्यक्षिके सादर केली.