उत्तनसाठी मत्स्यविभागाचे स्वतंत्र परवाना कार्यालय होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 08:15 PM2018-07-28T20:15:10+5:302018-07-28T20:15:18+5:30
भाईंदरच्या उत्तन, पाली, चौक परिसरातील मच्छीमारांसाठी मत्स्यविभागाचे स्वतंत्र कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती खासदार राजन विचारे आणि मत्स्य विभागाचे आयुक्त अरुण विंधले यांनी उत्तनच्या पाली येथे आयोजित मच्छीमारांच्या मेळाव्यात दिली.
खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने पाली येथील उत्तन मच्छीमार व वाहतूक सोसायटीच्या मदर तेरेसा सभागृहात मत्स्य व्यवसाय विभाग व मेरिटाइम बोर्डाच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी मच्छिमार मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यात उपस्थित मत्स्य व्यवसाय विभागाचे सहआयुक्त राजेंद्र जाधव व विनोद नाईक, प्रादेशिक उपायुक्त अभय देशपांडे, उपायुक्त युवराज चौघुले, सहाय्य्क आयुक्त दिनेश पाटील व भूषण पाटील, परवाना अधिकारी राजेश पाटील , अतुल साठे, तटरक्षक दलाच्या यामिनी गोदुले व मुकेश कुमार, सहाय्य्क पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार साळुंकेसह विविध विभागाचे अधिकारी आदींनी मच्छीमारांना मासेमारी, सुरक्षिततेसाठी घ्यायची खबरदारी, विविध योजना, कांदळवनाचे महत्व आदी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले.
नवीन जेट्टी मंजूर झाली असून, त्यासाठी 42 कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्याचे काम येत्या दिवाळीत सुरू होईल. पाली येथे मच्छीमारांसाठी डिझेल पंप मंजूर झाला आहे. मच्छीमारांसाठी समुद्रात असलेला जुना दिशादर्शक दिवा ( दीपस्तंभ ) बदलून नवीन दिवा मंजूर झाला आहे, असे खा . विचारे यांनी सांगितले. ओली व सुकी मासळी खरेदी करणाऱ्या काही व्यापाऱ्यांनी मच्छीमारांचे कष्टाचे पैसे थकवले असून पोलिसांनी त्यासाठी विशेष पथक तयार करून व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, अशी सूचना त्यांनी केली.
मासेमारी बोटीवरती घेण्यासाठी चौक व डोंगरी येथे दोन रॅम्प मंजूर झाले असून, एकाचे काम पूर्ण झाले आहे. रो रो सेवा मंजूर झाली आहे. शासनाच्या नीलक्रांती योजने अंतर्गत अनेक सोयी सुविधा असून त्याची माहिती मच्छीमारांना नियमित दिली जाणार आहे. उत्तनच्या मच्छीमारांना परवान्यांसाठी आता पालघरला खेपा माराव्या लागणार नाहीत . उत्तनसाठी स्वतंत्र कार्यालयाची मंजुरी झाली असून येथे पूर्णवेळ परवाना अधिकारी दिला जाणार असल्याचे विचारे यांनी सांगितले.
या मेळाव्याला माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोसा, माजी महापौर कॅटलीन परेरा, मच्छीमार नेते बर्नड डिमेलो, विरोधी पक्षनेते राजू भोईर, नगरसेविका हेलन गोविंद, शर्मिला बगाजी, अनिता पाटील, दीप्ती भट, नगरसेवक प्रवीण पाटील, एलायस बांड्या, जयंती पाटील, अनंत शिर्के, हरिश्चंद्र आमगावकर, शिवसेना मीरा भाईंदर जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, माजी नगरसेविका शबनम शेख, माजी नगरसेवक जॉर्जी गोविंदसह विल्यम गोविंद, विविध मच्छीमार संस्थांचे पदाधिकारी, जमातीचे पाटील, गाव पाटील, मच्छीमार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते मच्छीमारांना मासेमारीचे परवाने व बोट नोंदणी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच मच्छीमारांना समुद्रात कोणत्याही प्रकारचा धोका, अडचण निर्माण झाल्यास तातडीने त्याचा संदेश तटरक्षक दलास देता यावा म्हणून सुरक्षा यंत्रांचे वाटप अर्ज भरण्याची प्रक्रिया करून केले जाणार आहे. सध्या शंभर यंत्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या परिसरात सुमारे साडेसातशे मच्छीमार बोटी असून मासेमारी परवाना आदीसाठी पालघर येथे एकच कार्यालय असल्याने मच्छीमारांना खूपच त्रास सहन करावा लागतोय. पालघर आता वेगळा जिल्हा झाल्याने उत्तन येथे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी लवकरच पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.