भीषण आगीत मच्छीमार बोट खाक; ३० लाखांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 10:20 AM2024-01-28T10:20:17+5:302024-01-28T10:20:58+5:30
Mira Road: भाईंदरच्या उत्तन येथील पातान समुद्रकिनाऱ्याजवळ नांगरलेल्या मच्छीमार बोटीला लागलेल्या भीषण आगीत बोट जळून सुमारे ३० लाखांचे नुकसान झाल्याची घटना २६ जानेवारी रोजी घडली.
मीरारोड - भाईंदरच्या उत्तन येथील पातान समुद्रकिनाऱ्याजवळ नांगरलेल्या मच्छीमार बोटीला लागलेल्या भीषण आगीत बोट जळून सुमारे ३० लाखांचे नुकसान झाल्याची घटना २६ जानेवारी रोजी घडली. पातान बंदरात किनाऱ्यापासून समुद्रात काही अंतरावर मासेमारी बोटी नांगरल्या जातात. त्यात पातान बंदर येथील मच्छीमार सिरील घावट्या यांची पवित्र मारिया ऊर्फ राजश्री नावाची मासेमारी बोटसुद्धा नांगरलेली होती.
शुक्रवारी (दि. २६) समुद्रात उभ्या असलेल्या बोटीला अचानक आग लागली. बोटीवर मासेमारीची नायलॉन जाळी मोठ्या प्रमाणात असल्याने आग पटकन पकडून काळ्या धुराचा मोठा लोट उडाला. तेव्हा किनाऱ्यावरील मच्छीमारांना आग लागल्याचे लक्षात आले. काही मच्छीमारांनी मदतीसाठी धाव घेत आग विझविण्याचे प्रयत्न केले.
महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मासेमारी बोटीवरील आग पूर्णपणे आटोक्यात आणली असली तरी तोपर्यंत बोट खाक झाली होती.
मासेमारीची जाळी, जीपीएस व वायरलेस यंत्रणा, मासळी साठवण्याचे शीतगृह, बोटीवरील तांडेलची केबिन व खलाशांची राहण्याची जागा, किराणा सामान खाक झाल्याची नोंद अग्निशमन दलाने केली आहे. तसेच बोटीच्या लाकडी भागाचीसुद्धा मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.