उत्तन समुद्र किनाऱ्यावरील स्वच्छतेसाठी मच्छिमार सरसावले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 05:51 PM2017-09-29T17:51:08+5:302017-09-29T17:51:31+5:30
उत्तन मच्छिमारांनी उत्तन दर्यामाता चर्च, स्रेह ज्योत समाज केंद्र, कुटुंब सेवा केंद्र (एफएससी) यांच्या संयुक्त विद्यमानाने गेल्या २६ सप्टेंबरपासून येथील समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहिम राबविण्यास सुरुवात केल्याने येथील समुद्र किनारे यापुढे स्वच्छ राखले जातील.
- राजू काळे
भार्इंदर, दि. २९ - उत्तन मच्छिमारांनी उत्तन दर्यामाता चर्च, स्रेह ज्योत समाज केंद्र, कुटुंब सेवा केंद्र (एफएससी) यांच्या संयुक्त विद्यमानाने गेल्या २६ सप्टेंबरपासून येथील समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहिम राबविण्यास सुरुवात केल्याने येथील समुद्र किनारे यापुढे स्वच्छ राखले जातील, अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे.
सध्या उत्तनचे समुद्र किनारे अस्वच्छतेचे माहेरघर ठरु लागल्याने जलप्रदुषण वाढु लागले आहे. त्यातच या किनाऱ्यावर मोठ्याप्रमाणात मासेमारी होत असल्याने अस्वच्छतेत भर पडते. परिणामी किनाऱ्यावरील अस्वच्छतेमुळे तेथील लोकवस्तीतील नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. तसेच स्वत:च्या घरापुरती स्वच्छता राखुन इतरत्र मात्र अस्वच्छता करावी, हे योग्य नसल्याची बाब मीरा-भार्इंदरच्या उत्तनकर मच्छिमारांच्या ध्यानी आली. त्यांनी यंदाच्या गांधी जयंतीचे औचित्य साधुन किनाऱ्यावरील अस्वच्छता स्वच्छ करण्याचा संकल्प सोडला. मात्र यात कोणताही लोकप्रतिनिधी वा स्थानिक प्रशासनाचे पाठबळ न घेण्याचाही निर्धार करण्यात आला. मात्र स्थानिक सामाजिक संस्था असलेल्या उत्तन दर्यामाता चर्च, स्रेह ज्योत समाज केंद्र, कुटुंब सेवा केंद्र यांच्याच संयुक्त विद्यमाने स्थानिक मच्छिमारांच्याच सहभागातुन स्वच्छता मोहिम २६ सप्टेंबरपासुन राबविण्याचा संकल्प करण्यात आला. २६ सप्टेंबरला मच्छिमारांनी स्वच्छता मोहिमेला नवीखाडी, भोतोडी बंदर, पातान बंदर येथील किनाऱ्यापासुन सुरुवात केली. स्वच्छतेतून जमा करण्यात आलेला कचरा मात्र पालिकेकडून वेळीच उचलण्यात न आल्याने तो किनाऱ्यावर तसाच पडुन राहिला. त्यामुळे तो समुद्रातील भरतीच्या पाण्यासाबेत पुन्हा समुद्रात जात असल्याची खंत स्थानिकांकडुन व्यक्त करण्यात आली. यामुळे किनाऱ्यावर पुन्हा कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने तो पुन्हा जमा करण्यात आल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. २९ सप्टेंबरला पुन्हा मोठागाव किनाऱ्यावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आल्यानंतर जमा करण्यात आलेला कचरा पालिकेकडुन विलंबाने उचलण्यात आल्याचे सांगण्यात आले. पालिकेच्या या असहकारामुळे राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेला प्रोत्साहन मिळत नसल्याची तक्रार स्वच्छता मोहिमेतील सहभागी मच्छिमारांकडुन करण्यात आली. तसेच पालिकेने स्थानिक मच्छिमारांच्या सहकार्याने दररोज किनाऱ्यावरील कचऱ्याची साफसफाई करावी, अशी मागणी मच्छिमारांकडून करण्यात आली.
वेळोवेळी कचरा उचलला जावा, यासाठी पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांना संपर्क साधला असता ते म्हणाले कि,संबंधित अधिकाऱ्याना नियुक्त कंत्राटदाराकडुन दररोज उत्तन किनाऱ्यावर जमा होणारा कचरा उलण्याचे निर्देश दिले जाणार आहेत. किनारा स्वच्छ राखण्याची जबाबदारी स्थानिकांची सुद्धा असुन त्यांनी अस्वच्छता पसरविणाऱ्याना रोखून त्यांना स्वच्छता राखण्याचे आवाहन करावे, असे अपेक्षित आहे. त्याला पालिकेकडून पूर्णत: सहकार्य केले जाईल.