तस्करांपाठोपाठ शिकारीही जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 01:28 AM2018-04-24T01:28:17+5:302018-04-24T01:28:17+5:30
तुकाराम हरी वीर असे शिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्याकडून ठासणीची बंदूक आणि बिबट्याची नखे जप्त करण्यात आली आहेत.
डोंबिवली : कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने १९ एप्रिलला गुरुवारी सापळा लावून वन्यप्राण्यांच्या कातड्यांची तस्करी करण्यासाठी आलेल्या दुकलीला जेरबंद केले होते. याच प्रकरणात कसोशीने तपास करून बिबट्याची शिकार करणारा आणि वाघसदृश कातडे विक्रीसाठी देणारा, अशा आणखी दोघांना अटक केली आहे.
तुकाराम हरी वीर असे शिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्याकडून ठासणीची बंदूक आणि बिबट्याची नखे जप्त करण्यात आली आहेत. तर, अनिल दत्तू घोलप असे वाघसदृश कातडे विक्रीसाठी देणाºया आरोपीचे नाव आहे. तर, १९ एप्रिलला बदलापूर पाइपलाइन रोड, कोळेगाव परिसरात वन्यप्राण्यांच्या कातड्यांची तस्करी करण्यासाठी आलेल्या विशाल धनराज आणि सचिन म्हात्रे यांना कल्याण गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या पथकाने अटक केली होती. बिबट्या व वाघसदृश कातडे त्यांच्याकडून हस्तगत केले होते.
तस्करांनी चौकशीत दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तुकाराम वीर याला तो राहत असलेल्या खालापूर तालुक्यातील आंबेवाडी वावरले या गावातून अटक केली. तर, अनिल घोलप हा मीरा रोडला शांतीनगर परिसरात राहणारा आहे. तो वाघाच्या कातडीचा तस्कर आहे. या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी कल्याण सत्र न्यायालयाने सुनावली आहे.
जनावरे मारल्याने कृत्य
तुकाराम राहत असलेल्या खोंडा जंगलामध्ये बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. यातील एका बिबट्याने दोन महिन्यांपूर्वी तुकारामच्या ३० शेळ्या, एक गाय, एक बैल मारले होते. आपल्या जनावरांचे नुकसान झाल्यामुळे चिडलेल्या तुकारामने याच बिबट्याला ठासणीच्या बंदुकीतून गोळी झाडून ठार मारल्याचे त्याने चौकशीत कबूल केले.
जनावरे बिबट्याने मारल्यानंतर वनविभागाकडे तक्रार केली होती. परंतु, त्याच्या तक्रारीची दखल घेतली गेली नसल्याचे तुकारामचे म्हणणे आहे. त्याच्याकडे असलेली बंदूक बेकायदा असल्याचे चौकशीत उघड झाले आहे.