पालघरच्या वाढवण बंदराविरोधात मच्छीमारांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 11:47 PM2020-12-15T23:47:39+5:302020-12-15T23:47:45+5:30
खासगी उद्योगपतींना फायदा करून देण्यासाठी मच्छीमारांच्या मुळावर उठणारा हा वाढवण बंदर प्रकल्प कदापि होऊ देणार नाही, असा निर्धार मच्छीमार आंदोलकांनी बोलून दाखवला.
मीरा रोड : पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या विरोधात भाईंदरमधील मच्छीमारांनी केंद्र सरकारचा निषेध करत मंगळवारी आंदोलन केले व बंद पाळला. खासगी उद्योगपतींना फायदा करून देण्यासाठी मच्छीमारांच्या मुळावर उठणारा हा वाढवण बंदर प्रकल्प कदापि होऊ देणार नाही, असा निर्धार मच्छीमार आंदोलकांनी बोलून दाखवला.
समुद्रकिनाऱ्यावरील भाईंदरच्या उत्तन, पाली व चौक येथील मच्छीमारांनी बंद पुकारला होता. त्यामुळे या परिसरातील सर्व व्यवहार बंद होते. मच्छीमार आणि कोळी महिला काळे झेंडे आणि केंद्र सरकारच्या निषेधाचे फलक घेऊन आंदोलनात उतरले होते. राज्य सरकार वाढवण बंदराला विरोध करत असताना केंद्राने मात्र ५० टक्के खासगी भागीदारीतून प्रकल्प मंजूर केला आहे. या प्रकल्पाला मच्छीमारांसह शेतकऱ्यांचाही गेल्या १९ वर्षांपासून विरोध सुरू आहे. परंतु मच्छीमार व शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मर्जीतील उद्योगपतींना आंदण देण्यासाठी वाढवण प्रकल्पाचा घाट घातला जात असल्याचा आरोप यावेळी चौक मच्छीमार संस्थेचे जॉर्जी गोविंद यांनी केला.
मच्छीमार नेते लिओ कोलासो म्हणाले की, वाढवण बंदर ही तर कोळ्यांचे समुद्रकिनारे आणि बंदर गिळंकृत करण्याची ही केंद्राची सुरुवात आहे. स्वाभिमान आणि सन्मानाने जगणाऱ्या मच्छीमारांना उद्योगपतींच्या जंजाळात अडकवून देशोधडीला लावण्याचा हा केंद्र सरकारचा डाव असल्याचा घणाघात कोलासो यांनी केला .
बंदर झाल्यावर मोठी जहाजे येतील आणि मासेमारीवर संक्रांत येईल. मोठ्या जहाजांमुळे मासेमारी करता येणार नाही. मोठ्या जहाजांमुळे मच्छीमारांच्या लहान बोटींना अपघाताचा धोका निर्माण होऊन आपल्याला मासेमारी करता येणार नाही, असा आरोप विल्यम गोविंद यांनी केला.