किवाची मासेमारी जोरात, रोजगाराची संधी
By admin | Published: September 26, 2016 02:07 AM2016-09-26T02:07:26+5:302016-09-26T02:07:26+5:30
परतीच्या पावसात शेताशेतांच्या बांधाबांधांवर होणारी किवाची मासेमारी शहापूर तालुक्यात जोरात सुरू असून यामुळे स्थानिकांना चांगला रोजगारही मिळत आहे.
भातसानगर : परतीच्या पावसात शेताशेतांच्या बांधाबांधांवर होणारी किवाची मासेमारी शहापूर तालुक्यात जोरात सुरू असून यामुळे स्थानिकांना चांगला रोजगारही मिळत आहे.
पावसाळ्यातील जवळपास सर्वच कामे आटोपल्यावर शेतकरी आपापल्या शेतावर किंवा ओढ्यानाल्यांवर मासेमारीसाठी नालेओढ्यांतील पाणी अडवून त्याला सागाची पाने, दगड, झाडांचे वासे यांच्या साहाय्याने अडवलेले पाणी समोरच्या बाजूंनी सोडून प्रवाहात मासेमारी करतात. पावसाळ्यात जोरदार पाऊस पडताच नदीनाल्यांतील, धरणांतील मासे प्रवाहाबरोबर शेतात, डबक्यात अंडी सोडतात. परतीच्या पावसाबरोबर त्याच अंड्यांपासून तयार झालेले मोठे मासे आता पुन्हा नदीनालेओढ्यांतून जात असल्याने नेमक्या याच मार्गांवर किवाच्या साहाय्याने मासेमारी केली जाते. आज तालुक्यात सर्वच गावपाड्यांवर अशा प्रकारची मासेमारी होत आहे. या मासेमारीमुळे मोठ्या प्रमाणात मासे मिळत असून त्यामध्ये कडवावाळी, टोके, दंडावनी, मळे, वाई , पितोली, मुरे, खापू, चिचे, डाके, शिंगाले, वालंजी हे कॅल्शियमयुक्त मासे मिळत आहेत. या लहान माशांमुळे शरीराला मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळत असल्याने शरीराची हाडे मजबूत होण्यास व डोळे तेज होण्यास मदत होते. हे मासे ३०० रु पये किलो, तर २०
रु पये एक केजा (पानावर एक मूठभर मासे ठेवून ते पसरून देण्याचे एक माप), तर सुकवलेले मासे ५०० ते ६०० रु पये पायली, याप्रमाणे विकले जात आहेत. यामुळे ग्रामीण भागातील लोकांना चांगला रोजगार मिळत आहे. वर्षभर पुरतील इतके मासे वाळवून ठेवण्याची लगबगही सुरू आहे.