स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्यास पाच नगरसेवकांनी केला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 12:52 AM2020-03-13T00:52:13+5:302020-03-13T00:54:18+5:30
२७ गावांची सुनावणी : राज्य सरकारच्या निर्णयाकडे लागले लक्ष
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांप्रकरणी गुरुवारी दुसऱ्या दिवशीही बेलापूर येथील कोकण भवन कार्यालयात कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांच्याकडे सुनावणी झाली. या वेळी दोन नगरसेवक व तीन नगरसेविकांनी त्यांना २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका नको, अशी हरकत नोंदविली. दरम्यान, दोन दिवसांच्या सुनावणीचा अहवाल दौंड सरकारला सादर करणार असून, सरकार आता काय निर्णय घेणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
कोकण विभागीय आयुक्तांकडे बुधवारी हरकती सूचना नोंदवण्यासाठी २७ गावांतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. त्या वेळी प्रत्येक गावांचे सरपंच, उपसरपंचांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. गुरुवारीही सुनावणीचा दिवस होता, त्यामुळे गुरुवारीही पुन्हा काही ग्रामस्थ कोकण भवनला पोहोचले. मात्र, गर्दी टाळण्यासाठी शीघ्र कृती दल मागविण्यात आले होते. त्यामुळे बुधवारी ज्यांनी हरकती सूचना नोंदविल्या, त्यांना गुरुवारी मज्जाव करण्यात आला.
भाजप नगरसेवक मोरेश्वर भोईर, विनोद काळण, शिवसेनेच्या नगरसेविका प्रेमा म्हात्रे, रूपाली म्हात्रे, पूजा म्हात्रे यांनी स्वतंत्र नगरपालिका नको असल्याचे निवेदन दौंड यांना सादर केले. भोईर यांनी सांगितले की, काही कारणास्तव अन्य तीन नगरसेविका हरकती नोंदविण्यासाठी आलेल्या नाहीत. २७ गावांतील कचरा महापालिका उचलते. पाणीपुरवठा योजना केंद्राच्या अमृत योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आली आहे. काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत, त्यामुळे महापालिकेत राहून विकासच झाला नाही, अशी ओरड करणे चुकीचे आहे. राज्यात ही एकमेव महापालिका अशी आहे की, गावे वगळल्यानंतर ती पुन्हा महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर पुन्हा गावे वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली. ७ सप्टेंबर २०१५ ला काढलेल्या अधिसूचनेवर पुन्हा हरकती सूचना चार वर्षांनंतर घेणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला.
या वेळी मनसेचे आ. राजू पाटील यांनी या पाचही नगरसेवकांचे म्हणणे खोडून काढण्याचा प्रयत्न केला. पाटील यांनी सांगितले की, ७ सप्टेंबर २०१५ रोजी काढलेल्या अधिसूचनेकरिता आॅक्टोबर २०१५ मध्ये हरकती सूचना मागविल्या होत्या. त्याच हरकती सूचनांचा विचार केला जावा. नव्याने आलेल्या हरकती सूचना केवळ समोर ठेवण्यास हरकत नाही.
सर्वपक्षीय संघर्ष समितीनेही घेतली हरकत
सर्व पक्षीय संघर्ष समितीचे पदाधिकारी गुलाब वझे, चंद्रकांत पाटील, गजानन मांगरुळकर, दत्ता वझे, विजय भाने, वासुदेव गायकर, विठ्ठल व अरुण वायले यांनी पाचही नगरसेवकांच्या मागणीला पुन्हा हरकत घेण्याचा प्रयत्न केला.