पाच नगरसेवकांवर टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 12:35 AM2020-02-15T00:35:10+5:302020-02-15T00:35:13+5:30
विविध तक्रारी : अनेक वर्षांपासून प्रकरणे प्रलंबित, आज सुनावणी
मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या पाच नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या तक्रारींवर सुनावणीसाठी महापालिका प्रशासनाला तब्बल ११ महिन्यांनी १५ फेब्रुवारीचा मुहूर्त मिळाला आहे. गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून पालिकेने नगरसेवकांना पाठीशी घालण्यासाठी सुनावणीचा निव्वळ फार्स चालवला आहे. याशिवाय, अनधिकृत बांधकामाच्या कारवाईत अडथळा आणणाऱ्या भाजपच्या सात नगरसेविकांविरुद्ध नव्याने तक्रार दाखल झाली असून, तिची पहिली सुनावणीही शनिवारीच ठेवण्यात आली आहे. नवनियुक्त आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्यासमोर ही सुनावणी होईल.
भाजप नगरसेविका मेघना रावल, नीला सोन्स, विजय राय आणि परशुराम म्हात्रे तसेच शिवसेना नगरसेविका अनिता पाटील यांच्याविरोधातील तक्रारींवर शनिवारी सुनावणी ठेवण्यात आली आहे. याशिवाय, शांतीपार्कमधील अनधिकृत बांधकामावरील कारवाईत अडथळा आणणाºया भाजपच्या सात नगरसेवकांविरुद्ध संतोष बाणावलीकर यांनी केलेल्या तक्रारीवरही यावेळी सुनावणी होणार आहे. काँग्रेस नगरसेवक नरेश पाटील यांच्याविरोधातील तक्रारदार बाहेरगावी असल्याने ती नंतर घेतली जाईल. अपक्ष नगरसेवक राजीव मेहरा यांच्याविरोधातील तक्रारीची सुनावणी अगोदरच झालेली आहे.
मीरा रोडच्या साईबाबानगर येथे नगरसेविका मेघना यांचे पती दीपक यांनी अनधिकृत बांधकाम केले म्हणून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची तक्रार इरबा कोनापुरे यांनी केली. दोन वर्षांपासून सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविकेस प्रशासन पाठीशी घालत असल्याने कोनापुरे यांनी संताप व्यक्त केला. भाजप नगरसेविका नीला सोन्स आणि विजय राय यांनी कनकिया भागात अनधिकृत कार्यालय, वाचनालय बांधल्याने त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी ब्रिजेश शर्मा व रोलन मिरांडा यांनी केली आहे. याबाबतच्या गेल्या सुनावणीलादेखील नगरसेवकांनी दांडी मारली होती.
पेणकरपाडा येथील सरकारी जमिनीवर अनधिकृत पक्ष कार्यालयाचे बांधकाम केल्याची तक्रार करून भारत मोकल यांनी केली असून, भाजपचे नगरसेवक परशुराम म्हात्रे व शिवसेनेच्या नगरसेविका अनिता पाटील यांना अपात्र ठरवण्याची मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेस समर्थक नगरसेवक राजीव मेहरा यांनी माहिती लपवल्याने त्यांच्याविरुद्ध पराभूत उमेदवार साबीर शेख यांनी तक्रार केली होती.
प्रशासन दोषींना पाठीशी घालत असल्याचा आरोप
शांतीपार्कमधील गोकुळ व्हिलेजच्या भूखंडावर केलेल्या अनधिकृत बांधकामप्रकरणी महापालिकेने नोटीस बजावली असता, भाजपचे त्या प्रभागातील नगरसेवक प्रशांत दळवी, दीपिका अरोरा, आनंद मांजरेकर आणि हेमा बेलानींसह उपमहापौर चंद्रकांत वैती, नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील, सुरेश खंडेलवाल यांनी महापालिका मुख्यालयात आंदोलन करत उपायुक्तांना घेराव घातला. कारवाईस विरोध दर्शवत त्यांनी दमदाटी करत, आत्मदहनाचा इशाराही दिला. तरीही, या चारही नगरसेवकांनी पाठीशी घालत कोणतीही कारवाई केली नसल्याची तक्रार संतोष बाणावलीकर यांनी केली होती. त्यावर सुनावणीचा मुहूर्तदेखील पालिकेला मिळाला आहे.