कल्याण ग्रामीण भागात पाच दिवस कडक लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:41 AM2021-05-09T04:41:32+5:302021-05-09T04:41:32+5:30
टिटवाळा : कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणच्या ग्रामीण क्षेत्रात १० मे ...
टिटवाळा : कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणच्या ग्रामीण क्षेत्रात १० मे ते १४ मेपर्यंत कडक लाॅकडाऊन करण्याबाबत ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आदेश जारी केले आहेत. याबाबत कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांनी विनंती केली हाेती.
कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागात ४१ ग्रामपंचायती असून, एकूण ७० गावे, पाडे व वाड्या आहेत. या ठिकाणची दीड लाखाच्या आसपास लाेकसंख्या आहे. कोरोना आजाराचा प्रसार थांबविण्यासाठी साखळी तोडणे आवश्यक असल्याचे कल्याण तहसीलदार दीपक आकडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले होते. याची दखल घेत ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कडक लाॅकडाऊन घेण्यासाठीचा आदेश पारित केला आहे. ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण कल्याण ग्रामीण (मनपा क्षेत्र वगळून) क्षेत्रातील किराणा, भाजीपाला, फळे, दूध डेअरी, बेकरी, मिठाई व सर्व प्रकारचे अन्नपदार्थ विक्री दुकाने १० मे रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते १५ मे सकाळी ७ वाजेपर्यंत घरपोच सेवा वगळता सर्व बंद ठेवण्यात येण्यात असल्याचे आदेशात म्हटले आहे. या आदेशाची सर्वांनी तत्काळ अंमलबजावणी करावी. या आदेशाचे काेणत्याही व्यक्तीने उल्लंघन केल्यास अथवा विरोध दर्शवल्यास त्यांच्यावर त्याचवेळी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५१ ते ६० भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ व भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम १८८ नुसार दंडनीय, कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे तहसीलदार आकडे यांनी सांगितले.